>> सहनशक्ती कुलकर्णी
चित्रकाराचा संबंध रंगांशी नंतर येतो, अगोदर रेषांशी येतो. सरळ, नागमोडी, चित्रविचित्र रेषांमध्ये पकडलेले अवकाश ते बिटविन द लाइन्स. कुठल्या आहेत या लाइन्स? बालपण गेले ती पोलीस लाइन आहे, नंतर धरलेली चित्रकलेची लाइन आहे, भेटलेल्या असंख्य नमुनेदार माणसांची लाइन आहे. गुंतागुंत आहे, ती सोडवू पाहतानाची एक गंमतही आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी बिटविन द लाईन्स मध्ये त्यांचा रोचक कलाप्रवास वर्णन केला आहे. काळाच्या अनुक्रमाने त्यातील प्रकरण येत नसल्याने वाचताना एक वेगळीच मौज येते.
बिटविन द लाइन्स हे एकप्रकारे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुक्तचिंतन व मुक्तचरित्र म्हणायला हरकत नाही. रूढार्थाने ज्या प्रकाराला आत्मचरित्र म्हटलं जातं, त्यात अशा अनेक गोष्टी असतात, ज्याचा वाचकाला शून्य उपयोग असतो. डॉ लागूंनी ‘लमाण‘ हे आत्मचरित्र लिहिलं ते केवळ त्यांच्या अभिनयाच्या प्रवासावर आधारलेलं आहे. त्यात व्यक्तिगत बाबी क्वचितच आढळतात. नाटक, त्याबद्दलचं सखोल चिंतन, आपली भूमिका याविषयीचं विवेचन जास्त प्रमाणात त्यात असल्याने लमाणला एक महत्व प्राप्त होतं.
बिटविन द लाइन्स मध्येही चंद्रमोहन कुलकर्णी यांनी त्यांचा कलाप्रवास वर्णिलेला आहे. हा प्रवासही मोठा रोचक आणि मुक्त आहे. काळाच्या अनुक्रमाने त्यातील प्रकरणं नसल्याने एक वेगळीच मौज येते. वेगवेगळ्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेले चंद्रमोहन कुलकर्णी यांचे लेख संपादित करून हा ऐवज सिद्ध झाला आहे. कुंचला आणि लेखणी दोन्ही ज्यांना वश आहेत, असे द. ग. गोडसे यांच्यासारखे चित्रकार मराठी वाचकांना परिचित आहेतच. चंद्रमोहन कुलकर्णी यांनीही यावेळी शब्दांच्या माध्यमातून आपले अनुभव मांडले आहेत.
कलाकाराची जीवनातील प्रत्येक बाबीकडे पाहण्याची एक स्वतंत्र व सूक्ष्म दृष्टी असते. त्यातून दृश्यांचा एक अलग कॅलिडोस्कोप रसिकांसमोर तो उलगडून दाखवतो. चंद्रमोहन कुलकर्णी यांना चित्रकलेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं ते खुद्द वडिलांनी. वडील कर्तव्यदक्ष पोलीस होते. स्वारगेटजवळच्या पोलीस लाइन वसाहतीत वास्तव्य होते. पोलीस लायनीतली मुलं बऱया वाईटाच्या रेघेवर असतात, वाट चालता चालता कोण कुठल्या बाजूला पडतो यावर पुढचं लाइफ ठरतं, असं एका लेखात लेखक सांगतात. दुसऱया बाजूला पडलेला अज्या, मटका बघायला म्हणून लेखकाला घेऊन जातो, आणि रेड पडते. त्यात नेमकं पोलीस असलेले वडील यांना पकडतात… आणि मग धमाल उडते.
माणसांचं निरीक्षण करणं हे तर चित्रकाराचं कामच. त्या निरीक्षणातूनच, चित्राच्या रेषांमधील बारकावे अधिक ठळक करता येतात. पण त्यासोबतच लेखकाला माणसांच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची सवय आहे. अमुक एक माणूस असाच का असेल बरं. त्याच्या मनात आता काय असेल? तो कसा बोलतो, वागतो, या बारीकसारीक गोष्टींचं चंद्रमोहन निरीक्षण करतात. माणसांशी ते जिवंत संवाद साधतात. यामुळे केवळ त्यांची चित्रंच नाही, तर त्यांच्या शब्दांनाही एक विशेष सौंदर्य प्राप्त होतं. बिटविन द लाइन्समधील एक-एक व्यक्तिरेखा आपण वाचत असताना जणू मनाशी त्या व्यक्तीचं चित्र रेखाटत जातो, आणि चित्रकाराच्या नजरेशी ते मिळतेजुळते आहे का ताडून पाहतो. बरं, ही माणसं कोणती? तर, त्याला काही नियम किंवा बंधन असं नाही. चित्रकलेचं शिक्षण घेताना कितीतरी माणसं भेटली. जक्कल, सुतार जोडीतील जक्कल हा त्यांचा सहाध्यायी. र. कृ. जोशी, रेगे सर यांच्यासारख्या सव्यसाची शिक्षकांमुळे चित्रकलेच्या अनेक अंगांचं ज्ञान त्यांना घेता आलं. त्याच सुमारास, काही अनुभव गाठीशी असावा म्हणून एका प्रख्यात चित्रकारांकडे ते काही वेळ जात. मात्र, तिथे अनुभव काही वेगळाच आला, तोही त्यांनी नमूद केला आहे. कमर्शियल आर्टचे शिक्षण घेताना चंद्रमोहन यांनी स्वतला कुठेही बांधून घेतलं नाही. त्यामुळे त्यांच्या चित्रांना वेगळा आयाम मिळाला, तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वालाही. पुढे स्वतंत्रपणे काम सुरू केल्यानंतरही माणसं भेटत राहिली, मनात रुजत राहिली. यात भोपाळमध्ये भेटलेले साधू आहेत, स्टुडिओत काम करत असताना तिथे असलेल्या सिक्युरिटी गार्ड गणपुलेंपासून ते बिल्डिंगचे मालक बाळासाहेब धारप यांच्यापर्यंत. प्रकाशनांसाठी पुस्तकांच्या मुखपृष्ठाची किती कामं चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केली असतील? तर सुमारे बारा हजारांच्या आसपास. हे काम करत असताना विश्वामोहिनीचे आनंद अंतरकर भेटले तसंच, ब्रोमाईड प्रिंट काढणारे शिंदेही भेटले. हे शिंदे अगदी कठीण कामही लीलया करून देत असत. पुलं सारखे थोर लोक भेटले, तसंच दिवाळीला प्रेमाने आकाशकंदील बनवून देणारे अलिबागचे चितळेही भेटले. आत्मीयतेने बोलणाऱया शांताबाई शेळके, तसंच स्वहस्ते प्रेमाने खाऊ घालणाऱया साक्षात कमलाबाई ओगले! ही व्यक्तिचित्रं वाचताना लेखकाचा अक्षरश हेवा वाटतो.
शर्वरी रॉयचौधरीसारख्या जगविख्यात कलाकाराने, वय झालेलं असतानाही शिल्पकलेचं दिलेलं अविस्मरणीय डेमोन्स्ट्रेशन, महाकवी ग्रेस यांच्यासोबतच त्यांची काळजी घेणारा पंढरी हा कॉन्ट्रक्टर अशी माणसं नकळत वाचकाला आपली वाटू लागतात. पुस्तक वाचताना, अनेक ठिकाणी चित्रकलेच्या शिक्षणाचा उल्लेख होतो. त्यावेळी त्या शिक्षणातील पारिभाषिक संज्ञा, कामाचं स्वरूप याबद्दल खूप माहिती कळते. त्यामुळे फक्त आठवणी किंवा मुक्त विचार यापलीकडे या पुस्तकाला एक वेगळंच मूल्य प्राप्त होतं. मनातलं चित्र कॅनव्हासवर उतरवणं, ते मनातील भावना कागदावर शब्दांकित करणं हा चंद्रमोहन कुलकर्णी यांचा प्रवास रसिकांना नक्कीच आनंद देणारा व समृद्ध करणारा झाला आहे.
बिटविन द लाईन्स
लेखक: चंद्रमोहन कुलकर्णी
प्रकाशक: मजला प्रकाशन