मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरे हे सकारात्मक असून युतीबाबत शिवसेनेची ‘दिलसे’ भूमिका असल्याचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जाहीर केले. मनसेशी युती करण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा पक्षांतर्गत चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीतून मनसे-''शिवसेना’ युतीबाबात सूतोवाच केले होते. राज यांच्या मुलाखतीनंतर उद्धव यांनी युतीबाबतच्या चर्चेला सकारात्मक उत्तर दिले होत. दरम्यान, राज ठाकरे यांनी नुकत्याच एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनसे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीबाबत ओझरते भाष्य केले.
वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतींवर राजकीय पक्षांच्या चर्चा ठरत नसल्याचे राऊत म्हणाले. मात्र राज ठाकरे यांच्या मनसेशी नाते जोडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका सकारात्मक असल्याचे राऊत यांनी आज स्पष्ट केले. मुलाखतीत कोण काय बोलते त्यापेक्षा पडद्यामागे उद्धव ठाकरे काय बोलतात, हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे मन विशाल आणि मोठे आहे. मराठी माणसाचे अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील तर त्या पूर्ण करण्यासंदर्भात शिवसेनेला मागे हटता कामा नये, असे उद्धव ठाकरे यांना वाटत. त्यासाठी त्यांनी मनसेशी युतीबाबत काल पक्षांतर्गत चर्चा केली असून याबाबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नसल्याचं ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना सांगितल्याचे राऊत म्हणाले.
राज्यातील जनतेला हवी युती!ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेदरम्यान युती व्हावी ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली इच्छा आहे. यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर मराठी जनतेचा दबाव आहे. हा भावनिक आणि राजकीय स्वरूपाचा दबाव आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला हक्क कायम ठेवायचा असेल आणि मोदी-शहा-फडणवीस प्रोप्रायटर असलेल्या ईस्ट इंडिया कंपनी (सुरत) प्रायव्हेट लिमिटेडच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसांना सर्व मतभेद, जळमटे आणि किल्मिष विसरून एकत्र यावे लागेल अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
ठाकरे व पवार ब्रॅण्ड संपणार नाही‘‘जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे आणि पवार ब्रॅण्ड संपवत नाही तोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राचे तुकडे करता येणार नाही, असे दिल्लीतील भाजप नेत्यांना वाटते. त्यासाठी त्यांचे पक्ष तोडून त्यांच्या लोकांना तुरुंगात टाकण्यात आले.. दिल्लीतून विविध प्रकारे प्रयत्न केले जात असतात. परंतु लोक ठाकरे आणि पवारांच्या पाठीशी अजूनही आहेत. मोदी, शहा, फडणवीस यांनी देशासाठी काहीच केलेले नसल्यामुळे त्यांची नावे देशातून पुसली जातील. परंतु ठाकरे-पवार ब्रॅण्ड हा राजकारणातून कधीच संपणार नाही,’’ असे राऊत म्हणाले.