रायबाग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या मेखळीतील मठाच्या (Mekhali Monastery) स्वामीला पोलिसांनी अटक केली. मुडलगी (Mudalgi Police) ही कारवाई केली असून, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. लोकेश्वर स्वामी (रा. मेखळी, ता. रायबाग) असे या नराधम स्वामीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, मेखळी येथील मंदिराच्या मठात लोकेश्वर स्वामी (Lokeshwar Swami) वास्तव्यास आहे. त्याच्याकडे भक्त येत असतात. जिल्ह्यातील भक्ताची १७ वर्षीय मुलगी रस्त्यावर थांबलेली असताना १३ मे रोजी तिच्याजवळ येऊन स्वामीने मोटार उभी केली. ‘मी तुमच्या घरापर्यंत तुला सोडतो’, असे सांगून तिला मोटारीमध्ये घेऊन रायचूर व बागलकोटला घेऊन गेला. तेथे लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर बसस्थानकावर तिला १६ मे रोजी पुन्हा आणून सोडले. ‘या प्रकारची माहिती कुणाला सांगितल्यास तुला जीवे मारून टाकीन’, अशी धमकी स्वामीने त्या मुलीला दिली होती. मुलगीने घरी आल्यानंतर कुटुंबीयांना याची माहिती दिल्यानंतर याप्रकरणाची पोलिसांत नोंद केली. त्यानुसार बागलकोट महिला पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण मुडलगी पोलिस ठाण्याकडे वर्ग केले. मुडलगी पोलिसांनी स्वामीला जेरबंद करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
स्वामीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची बातमी कळताच मेखळी ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी मेखळी गावाच्या बाहेरील राम मंदिर मठाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी मठात तपासणी केली असता मठात धार्मिक वस्तूंपेक्षा वेगवेगळ्या तलवारी, जांबिया, कोयते अशी शस्त्रे सापडली आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या स्वामीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत मठाची तोडफोड केली. ग्रामस्थ वसंत करीगार म्हणाले, ‘लोकेश्वर स्वामी मठात असायचा. जुगाराच्या टीप्स घेण्यासाठी लोक येत होते. यावर कोणी आवाज उठविल्यास लाठी, काठी घेऊन धमकावले जात होते.’