छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या वर्गापासून शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अधिक सुलभता लाभणार असून, अतिरिक्त अभ्यासाचा मानसिक ताणही टळणार आहे.
राज्यात यापूर्वी चौथी आणि सातवीत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात होती. मात्र, पुढे यामध्ये बदल करत ही परीक्षा पाचवी व आठवीत घेतली जाऊ लागली. त्यामुळे पाचवीतील विद्यार्थ्यांना एकाच वेळी नवोदय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा दोन्ही द्याव्या लागत होत्या.
यामुळे त्यांच्या तयारीवर परिणाम होत होता. त्याचप्रमाणे आठवीतील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) आणि राज्य शिष्यवृत्ती परीक्षा या दोन्हींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाची स्थिती निर्माण होत होती.
शिक्षणात वाढेल गुणवत्ताशिक्षणतज्ज्ञांच्या मते, ही पूर्ववत चौथी व सातवीत परीक्षा घेण्याची पद्धत विद्यार्थ्यांसाठी अधिक योग्य ठरणार आहे. या वयोगटातील मुलांमध्ये स्पर्धा परीक्षांची पायाभूत तयारी करण्याची मानसिकता अधिक असते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा खरा उद्देश साध्य होण्यास मदत होईल. तसेच, या निर्णयामुळे शालेय शिक्षणात गुणवत्ता वाढण्याची शक्यता आहे.
वंचित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनराज्यातील बहुतांश प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन व सराव परीक्षा घेत असतात. अशा शाळांना आता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दाखवण्याची चांगली संधी मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण व आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांनाही कमी वयात मार्गदर्शन मिळेल व त्यांच्यात स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता निर्माण होईल.
शासकीय परिपत्रक लवकरच जारीशिक्षण विभाग सध्या या नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते नियोजन करत आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात अधिकृत शासकीय परिपत्रक जारी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शिष्यवृत्ती परीक्षा अधिक प्रभावी ठरेल, विद्यार्थ्यांना नवोदय व एनएमएमएससारख्या इतर परीक्षांसाठी स्वतंत्रपणे तयारी करता येईल आणि शालेय शिक्षण अधिक सक्षम होईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
चौथी व सातवीत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सुरवातीपासून तयार होण्याची संधी मिळणार आहे. अभ्यासाचा अनावश्यक बोजा टाळून, गुणवत्तेच्या दिशेने विद्यार्थ्यांचे पाऊल पुढे पडेल.
- डॉ. रूपेश मोरे,
शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच नवोदय व एनएमएमएस परीक्षा देखील द्याव्या लागत आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आता चौथी आणि सातवीला शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.
- प्रकाश सोनवणे,
राज्याध्यक्ष, प्राथमिक मुख्याध्यापक महासंघ