IPL 2025 GT Vs CSK : कसोटी कर्णधारपदानंतर गिल आज मैदानात; गुजरातने विजय मिळवल्यास क्वालिफायर-१ सामना निश्चित
esakal May 25, 2025 02:45 PM

Gujarat Titans playoff qualification scenario : भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर आज लगेचच शुभमन गिल मैदानात उतरत आहे. आयपीएलमध्ये पहिल्या दोन स्थानात कायम राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा संघ सन्मानासाठी खेळेल.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने बंगळूर संघाचा पराभव केल्यामुळे पहिल्या दोन क्रमांकात रहाण्यासाठी गुजरातच्या आशा कायम राहिल्या आहेत. आज चेन्नईचा पराभव केला, तर त्यांचे २० गुण होतील आणि त्यांचे पहिले किंवा दुसरे स्थान कायम राहील. परिणामी त्यांना क्वॉलिफायर-१ सामना खेळण्याची संधी मिळेल.

चेन्नईचा संघ तळाला आहे. आज विजय मिळवला तरी या क्रमांकातून त्यांची सुटका होणार नाही. त्यामुळे आता भविष्यातील संघ उभारण्यासाठी प्रयोग करण्यावर त्यांचा भर असेल. गुजरातला गेल्या सामन्यात लखनऊने पराभवाचा धक्का दिला. सलग तीन विजयांनंतर त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती, मात्र प्लेऑफमध्ये खेळण्यापूर्वी विजय पाठीशी असण्यासाठी गुजरातकरिता हा सामना महत्त्वाचा आहे.

गुजरातने १३ पैकी नऊ सामन्यांत मिळवलेल्या विजयात शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर या पहिल्या तीन फलंदाजांचे योगदान निर्णायक राहिले आहे. आता बटलर आजचा सामना खेळून देशाकडून खेळण्यासाठी मायदेशी परतेल. त्यामुळे गुजरातची ही बसलेली घडी विस्कटू शकते. गुजरातने लखनऊविरुद्धचा सामना गमावला, मात्र मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मधल्या फळीत रुदरफर्ड आणि शाहरुख खान यांनी जोरदार लढा दिला होता. गुजरातसाठी या दोघांकडून धावा होणे पुढच्या सामन्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

गुजरातला चिंता गोलंदाजीची असणार आहे. हुकमी आणि अनुभवी फिरकी गोलंदाज राशीद खान अपयशी ठरत आहे. डावाच्या मध्यावरती त्याची षटके महागडी ठरत आहेत, परंतु गुजरात संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरचा विश्वास कायम ठेवला आहे. वेगवान गोलंदाजीत कागिसो रबाडाही आजचा सामना जिंकून राष्ट्रीय संघात जाणार आहे. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्यावरची जबाबदारी वाढणार आहे.

चेन्नई संघासाठी ही स्पर्धा फारच निराशाजनक राहिलेली असली तरी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या आयुष म्हात्रे आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी छाप पाडली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ते कशी फलंदाजी करतात, याची उत्सुकता असणार आहे.

धोनीचा अखेरचा सामना?

गेल्या काही वर्षांपासून धोनीसाठी अखेरची आयपीएल असल्याची चर्चा होत असते. तशी यंदाही चर्चा झाली. आजचा सामना चेन्नईचा अखेरचा सामना आहे. धोनी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे नाणेफेकीसाठी आणि सामन्यानंतर त्याला भवितव्याबाबत विचारले जाऊ शकते. त्यावर धोनी कोणते उत्तर देतो, याचीही उत्सुकता असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.