Pre-Monsoon : मराठवाड्यात मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच; नदी-नाल्यांना आले पाणी, मशागतीची कामे खोळंबली, तापमानात कमालीची घट
esakal May 25, 2025 02:45 PM

छत्रपती संभाजीनगर : रखरखत्या उन्हामुळे मे महिन्यात नागरिक बेजार झालेले असतात. रानोमाळ पानझड दिसून येते. नद्या-नाले कोरडेठाक असतात. मात्र, यंदा हे चित्र मॉन्सूनपूर्व पावसामुळे बदलले.

सलग दहा दिवसांपासून मराठवाड्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. परिणामी नदी-नाल्यांना पाणी आले असून रानोमाळ हिरवळ नजरेस पडू लागली. शिवाय ४५ अंशांपर्यंत पोचणाऱ्या तापमानाचा पारा सरासरी २८ अंशांवर येऊन ठेपला.

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस सुरूच असून यामुळे नदी-नाल्यांना पाणी आले आहे. काही भागांत जोरदार पाऊस होत असल्याने खरिपाच्या मशागतीची कामे खोळंबली आहेत. तर, काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झाले.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. शनिवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास पाऊस थांबला. दरम्यान, दुपारी चारला पुन्हा पाऊस झाला. या पावसाने पहिल्यांदाच मे महिन्यात शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पाणी आले. जिल्ह्यात सकाळी आठपर्यंत ११.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजवर हिंगोली तालुक्यात ८.७ मिमी, कळमनुरी १३.९, वसमत ५.६, औंढा ७.३, सेनगाव तालुक्यात ७.८ मिमी पावसाची नोंद झाली.

रात्रभर बरसल्या सरी

जालना ः शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी शुक्रवारी (ता.२३) रात्रभर मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. शहरात मध्यरात्रीपर्यंत मॉन्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू होती. तर, अंबड शहरासह तालुक्यातील शहागड, रोहिलागड, अंकुशनगर, मंठा आदी ठिकाणांसह घनासावंगी शहरात रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. दरम्यान, शनिवारी (ता.२४) सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे भर मे महिन्यात दिवसभर सूर्य दर्शन झाले नाही.

तब्बल ६० मंडळांत ‘दमदार’

लातूर ः जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांत गेल्या २४ तासांत दमदार पाऊस झाला. यात तीन महसूल मंडळांत, तर ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. तर, पंधरा मंडळांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी (ता. २४) रात्रीही शहर व परिसरात पावसाने हजेरी लावली. लातूर तालुक्यातील बाभळगाव मंडळात २७८.४, गातेगाव २०५.८, कन्हेरी १९९.३, बेलकुंड (ता. औसा) २१४.२, औराद (ता. निलंगा) २३२.७, अंबुलगा २३१.५, हालगरा २३५, उदगीर (ता. उदगीर) २२३.४, नागलगाव २२१, तोंडार २२२.१, चाकूर (ता. चाकूर) २१०, वडवळ २०८.८, आष्टा २०९.१, रेणापूर २४८.६, शिरूर अनंतपाळ मंडळात २०१.१ मिलिमीटर पाऊस झाला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.