पाली, ता. २५ (वार्ताहर) ः अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. त्यामुळे पालीतील नागरिकांना नळाद्वारे चिखलयुक्त पाणी येत असून, नागरिकांसह बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चार-पाच दिवस पाली नगर पंचायतचे पाणी पूर्ण गढूळ येत आहे. याबाबत कोणीच काही उपाययोजना करत नसल्याचे झाप येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयश भालेराव यांनी सांगितले. नगर पंचायतकडून येणाऱ्या पाण्यात जीवजंतू येतात. अशा पाण्याचा वापर पिण्यासाठी, स्वयंपाकघरात, अंघोळीसाठी करावा लागत असल्याचे गृहिणी सुरेखा जाधव यांनी सांगितले.
नदीला प्रदूषणाचा विळखा
अंबा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी, घाण व कचरा, वाळू उपशामुळे नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्यानेही पाण्याला दुर्गंधी येते. चवही खराब लागते. पावसाळ्यात तर नियमित गढूळ पाण्याचा पुरवठा होतो.
शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा
पालीकरांना अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरिनेशनची प्रक्रिया न करता थेट नळाद्वारे घराघरांत पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येतात. पालीची स्थायी लोकसंख्या १५ हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाइलाजाने गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आतापर्यंत नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे नेहमीचेच आहे. शिवाय २७ कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली आहे.
पावसामुळे अंबा नदीचे पाणी गढूळ झाले आहे. उन्हाळ्यात पाणी साठण्यासाठी अंबा नदीला बलाप जवळ बंधारा बांधण्यात येतो आणि पाऊस सुरू झाल्यानंतर बंधाऱ्याचे दरवाजे उघडले जातात, मात्र आता उन्हाळ्यातच पाऊस आल्याने आणि बंधारा बंद असल्यामुळे नदीच्या पाण्याला वाहण्यासाठी मार्ग नाही. परिणामी पाणी साचल्याने अधिक गढूळ होते. नागरिकांनी खबरदारी म्हणून पाणी गाळून व उकळून प्यावे. पाली शुद्ध पाणी योजना लवकर कार्यान्वित व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी आवश्यक पाठपुरावाही सुरू आहे.
- प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्षा, पाली
सध्या नळाला अतिशय दूषित, गढूळ पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लवकर प्रलंबित शुद्ध पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी व नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच नागरिकांना शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.
- महेश बारमुख, शिक्षक, पाली