जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे गेल्या दोन आठवड्यांपासून राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीट प्रकरणावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिलीय. सीबीआय आणि ईडीला विनंती केलीय की खोटे आरोप माझ्यावर लावू नका. मी सध्या एकाच खोलीच्या घरात राहतोय आणि माझ्यावर कर्ज आहे.
सत्यपाल मलिक यांनी किरू जलविद्युत प्रकल्पात घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने सत्यपाल मलिक यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलंय. यानंतर माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक फोटो शेअर करत मी रुग्णालयात असल्याचं सांगितलं आहे.
सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, मी दोन आठवड्यांपासून रुग्णालयात आहेत. दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या एजन्सी सीबीआय़ने माझ्यावर आरोपपत्र दाखल केलंय. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्यांचे कैवारी स्वर्गीय चौधरी चरणसिंह यांनी घालून दिलेल्या आदर्शांचं पालन केलंय. राजकीय कारकिर्दीत पूर्ण प्रामाणिक होतो. त्यामुळे या आरोपपत्राला घाबरणार नाही असंही सत्यपाल मलिक म्हणाले.
सीबीआयने ज्या प्रकरणात सत्यपाल मलिक यांच्यावर आरोपपत्र दाखल केलंय. त्या प्रकरणी सत्यपाल मलिक यांनी मोठा दावाही केलाय. ज्या घोटाळ्याचा आरोप माझ्यावर होतोय तो घोटाळा मीच पंतप्रधान मोदींना सांगितला होता. त्यामुळे मी प्रकल्प रद्दही केला होता. पण माझी बदली होताच हे टेंडर पुन्हा निघालं असं सत्यपाल मलिक यांनी सांगितलं.
मोदीजी आणि सीबीआयने देशवासियांना सांगावं मी ज्या भ्रष्टाचाराबाबत तुम्हाला सांगितलं त्याची चौकशी कुठंपर्यंत पोहोचलीय. सीबीआय, ईडी तुम्ही प्रमाणिक असाल तर माझी संपत्ती किती वाढली सांगा, माझी संपत्ती वाढली नसेल तर माझ्यावर खोटा आरोप करू नका अशा शब्दात सत्यपाल मलिक यांनी आव्हान दिलंय.
सत्य तर हेच आहे की मी एका खोलीच्या घरात राहतो आणि मी कर्जात आहे. सरकारी संस्थांना विनंती आहे की मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. हिंमत असेल तर खरी चौकशी करा. हुकुमशाही सरकारसमोर मी उभा आहे असंही सत्यपाल मलिक म्हणाले.