महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील मोहिमेचा अप्रतिम शेवट केला आहे. सीएसकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या 67 व्या सामन्यात यजमान गुजरात टायटन्सचा 83 धावांनी धुव्वा उडवत चौथा विजय मिळवला. चेन्नईने गुजरातला विजयासाठी 231 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांसमोर गुजरातला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातचा डाव 18.3 ओव्हरमध्ये 147 रन्सवर आटोपला. चेन्नईने यासह हा सामना जिंकला. तर प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेल्या आणि टॉप 2 च्या शर्यतीत असलेल्या गुजरातला मोठा झटका लागला. गुजरातच्या या पराभवामुळे आता पंजाब किंग्ससह मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांना टॉप 2 मध्ये पोहचण्याची संधी आहे. सोमवारी 26 मे रोजी पंजाब विरुद्ध मुंबई सामना होणार आहे.