गेवराई - धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईच्या गढीनजीक भीषण अपघातात सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (ता. २६) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.मंगळवारी या सहा युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कमावते गेल्याने कुटुंबाचा एकच आक्रोश पाहण्यास मिळाला असून, गेवराई शहरात शोकाकुल वातावरण झाले होते.
गेवराई शहरातील यश आतकरे यांच्या कारला आपघात झाल्याने ही कार टोचन करुन आणण्यासाठी गेवराईतील बाळु आतकरे, भागवत परळकर, सचिन नन्नवरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव आणि दिपक सुरय्या हे गढी गेले होते.
तिथे वाहन क्रेनने टोचन करण्यासाठी महामार्गावर ते उभे असताना बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या भरधाव आयशर टेम्पोने चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना जोराची धडक दिल्याने या सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला.
सदरील आयशर टेम्पोने नंतर त्याच घटनास्थळापासून पुढे काही जणांना धडक दिली यात अन्य दोघे जखमी झाले. सहा जणांचे मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल होताच नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.
सहा जण करत होते विविध व्यवसाय -
गेवराई शहरातील दाभाडे गल्लीतील रहिवासी असलेले भागवत परळकर हे रिक्षा चालवत शालेय विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम करत होते दरम्यान यावर त्यांच्या परीवाराचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ, आई असा परिवार आहे. त्यांच्यावर गवळी समाजाच्या स्मशानभूमीत दफन विधि करण्यात आली.
बाळासाहेब आतकरे हे शहरातील सावता नगर येथे गेल्या काही वर्षांपासून कापड दुकान व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी आई , भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या वर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेवराई तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी असलेले मनोज करांडे यांचे गेवराई - शहागड रस्त्यावर श्नी साई मोटर्स चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. ते सदरील चारचाकी गाडी दुरूस्त करण्यासाठी गेले होते.
गाडी दुरूस्त करण्यासाठी क्रेन ने लगेच घेऊन येत असताना त्यांचाही अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, आई वडील भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मनोज करांडे यांच्या पार्थिवावर रांजणीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिपक सुरय्या यांचा परीवार गेल्या ५० वर्षांपासून गढी येथे स्थायिक असून, त्याचे वडील हे गेवराई नगर परिषद येथे कर्मचारी होते तर ते भवानी बॅकेत सेवक म्हणून काम करत होते. त्यांच्या वर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार आले.
दिपक नन्नवरे हे गेवराई शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असून मजुरी अमावास्या असल्याने कालच सोमवारी दोन दिवसांपूर्वी आपल्या बहिणीला घेऊन गेवराई येथे सकाळी आले होते. त्यांच्या वर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कृष्णा जाधव हे गेवराई तालुक्यातील ब्रम्हपुर येथील रहिवासी आहेत. त्यांचे माऊली क्रेन असून क्रेनने ते चारचाकी गाडी आणण्यासाठी गेले होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला असून गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात दोन मुले, आई वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या दोघांवर गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.