भारताने कझाकस्तान येथे झालेल्या १६ वर्षांखालील ज्युनियर डेव्हिस कप स्पर्धेत पाकिस्तानला २-० अशा फरकाने २४ मे रोजी पराभूत केले. या स्पर्धेत भारताच्या प्रकाश सरन आणि तविष पहवा यांनी एकेरीमध्ये सुपर टायब्रकमध्ये विजय मिळवत भारताचा विजय नक्की केला. तथापि, आता या लढतीनंतर एक वादग्रस्त घटना समोर आली आहे.
लढतीच्या तीन दिवसांनंतर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओ एका सामन्यानंतर असून यात पाकिस्तानी खेळाडू खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध कृती करताना दिसत आहे.
सामना संपल्यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी खेळाडू एकमकांशी हस्तांदोलन करतात. त्यानुसार २४ मे रोजी सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी आला होता.
त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूने आधी जोरात हात हलवून हस्तादोलनाचा प्रयत्न केला, पण त्याचा हातही भारतीय खेळाडूच्या हाताला स्पर्श करू शकला नाही. त्यावेळी भारतीय खेळाडू शांतपणे उभा होता.
त्यानंतर कोणीतरी पाकिस्तानी खेळाडूला हस्तांदोलन करण्यास सांगितल्याचे ऐकू येत आहे. त्यानंतर तो परत आला पण त्यावेळी त्याने अनादर करत जोरात हात भारतीय खेळाडू्च्या हातावर आपटताना आणि काहीतरी बोलताना दिसला. पण या घटनेदरम्यान भारतीय खेळाडू शांत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावानंतर हा सामना झाला होता. आता पाकिस्तानी खेळाडूच्या वागण्यावर या तणावाचाच परिणाम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यात २६ लोकांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले झाले. त्यानंतर भारतीय सैन्याकडूनही त्याचे चोख प्रत्युत्तर देण्यात आले. साधारण तीन दिवस दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले झाल्याने युद्धजनक परिस्थिती उद्भवली होती. पण अखेर १० मे रोजी दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली आणि परिस्थिती शांत झाली होती.