आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 फेरीतील पहिला सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. हा सामना 29 मे रोजी मुल्लांपूरमध्ये होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरी गाठणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व अधिक आहे. या सामन्यात पंजाब किंग्सच्या तुलनेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पारडं जड वाटत आहे. त्यामुळे आरसीबीचं अंतिम फेरी गाठणं जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. पंजाब किंग्ससोबत 38 दिवसांपूर्वी असंच काहीसं घडलं होतं. त्यामुळे पंजाब किंग्सच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. नेमकं 38 दिवसांपूर्वी काय झालं होतं? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर जाणून घ्या. 20 एप्रिल 2025 रोजी मुल्लांपूरमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ भिडले होते. या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सला 7 विकेट्सने पराभूत केलं होतं.
आयपीएल स्पर्धेतील 37व्या सामन्यात पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 157 धावा केल्या. तसेच विजयासाठी 158 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 18.5 षटकात फक्त 3 गडी गमवून पूर्ण केलं. विराट कोहलीने या सामन्यात 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 73 धावा केल्या. सामन्यानंतर विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. यावेळी विराट कोहलीने श्रेयस अय्यरला मजेशीर अंदाजात डिवचलं होतं. खरं तर क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सकडे आरसीबीची हिशेब चुकता करण्याची संधी आहे. पण त्याची शक्यता कमीच दिसत आहे. कारण मुल्लांपूरचं मैदान हे पंजाब किंग्सला तितकं भावलं नाही.
पंजाब किंग्सने आयपीएल 2025 साखळी फेरीतील 4 सामने मुल्लांपूरमध्ये खेळले आहेत. त्यापैकी 2 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे जय पराजयाचं गणित हे 50-50 आहे. त्यामुळे आरसीबी पंजाब किंग्सच्या कमकुवत बाजूचा लाभ घेत अंतिम फेरी गाठू शकते. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केल्यानंतर जितेश शर्माने सांगितलं की, ‘ हेझलवुड तंदुरुस्त आहे आणि आमच्या संघातील विश्वास प्रणाली खूप मजबूत आहे आणि तुम्ही जे काही खेळाडू पहाल, ते सर्वजण सामना जिंकणारे आहेत आणि जरी आम्ही 3-4 विकेट गमावल्या तरी, आमच्यात नेहमीच विश्वास होता.’