लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप; विवाहितेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, तरुणाला दिलासा
esakal May 29, 2025 10:45 PM

लग्नाचं आमिष दाखवून महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर बलात्काराचा गुन्हा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला. महिला आणि आरोपी विद्यार्थी यांच्यातले संबंध हे एकमेकांच्या संमतीने होते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. या प्रकरणात विद्यार्थ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचं आधीच लग्न झालं होतं. न्यायालयाने यावर आश्चर्य व्यक्त केलं.

महिला आणि तरुण यांच्यात जेव्हा प्रेमसंबंध निर्माण झाले तेव्हा ती विवाहित होती. जरी ती पतीपासून वेगळी राहत असली तरी तिचा घटस्फोट झाला नव्हता. न्यायालयाने म्हटलं की, हे प्रकरण लग्नाच्या आमिषाने बलात्कार असं मानलं जाऊ शकत नाही. जर संबंधाच्या सुरुवातीपासून आरोपीचा कोणताही गुन्हेगारी उद्देश नसेल तर तोपर्यंत फक्त लग्नाचं आश्वासन देऊन शरीरसंबंध ठेवणं म्हणजे बलात्कार असं मानता येणार नाही.

न्यायमूर्ती बीवी नागरत्न आणि न्यायमूर्ती एससी शर्मा यांनी या प्रकरणी सुनावणी केली. न्यायालयाने म्हटलं की, सुरुवातीला लग्नाचं आमिष दाखवल्याचं हे प्रकरण नाही. नात्यात दुरावा येण्याने गुन्हा दाखल करण्यामुळे फक्त न्यायालयाच्या कामकाजावर ओझं वाढतं. तसंच अशा खटल्यांमुळे आरोप ज्यांच्यावर केले जातात त्यांच्या प्रतिमा मलिन होतात.

न्यायालयाने या प्रकरणी तरतुदींच्या वापरावरही इशारा दिला आहे. लग्नाच्या प्रत्येक आश्वासनाच्या उल्लंघनाला खोटं सांगून कलम ३७६ अंतर्गत खटला चालवणं मूर्खपणा असल्याचंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

आरोपी तरुणाने आधी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं निराशा झाल्यानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. विद्यार्थ्याचं वय २३ वर्षे होतं. त्याच्यावर विवाहित महिलेनं आरोप केला होता की लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आरोप खोटे आहेत की खरे याची चौकशी केली होती. तेव्हा आरोपीशी शरीरसंबंध ठेवताना महिला विवाहित होती आणि तिने संमतीनेच शरीरसंबंध ठेवले होते असं आढळलं होतं.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, विवाहित असताना लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले असा आरोप करता येणार नाही. महिला आणि आरोपी यांच्यातलं नातं १२ महिन्यांपेक्षा जास्त होतं. दोघेही वेगवेगळ्या वेळी लॉजवर गेले होते. महिलेला चार वर्षांचा मुलगासुद्धा असल्याचं तरुणाने निदर्शनास आणून दिलं. यानंतर न्यायालयाने तरुणाविरोधात एफआयआर रद्द केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.