Rohini Khadse clarification on statement made about the lawyers in the Vaishnavi Hagawane case
Marathi May 30, 2025 01:26 PM


मुंबई : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. 28 मे) शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून वैष्णवीवर आरोप करण्यात आले. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, असा युक्तीवाद हगवणेंचे वकील विपुल दुशींग यांनी केला. त्यानंतर राज्यभरातून वकील दुशींग यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी तर ‘त्या’ वकिलाच्या चार कानशिलात लावेल, त्याचा मी सत्कार करणार, अशा आशयाची पोस्ट केली. खडसेंच्या या पोस्टमुळे पुणे बार असोसिएशनकडून आक्षेप घेण्यात आला असून त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. ज्यानंतर रोहिणी खडसेंनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. (Rohini Khadse clarification on statement made about the lawyers in the Vaishnavi Hagawane case)

शिवाजीनगर न्यायालयात वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीत हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीवरच आरोप करण्यात आले. वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईड करण्याची होती. तर तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट समोर आले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदराचे औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे समोरून नकार दिला असेल म्हणून वैष्णवीने आत्महत्या केली असेल, असा धक्कादायक दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी न्यायालयात केला. ज्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये “जो ‘त्या’ वकिलांच्या चार कानशिलात लावेल, त्याचा मी सत्कार करणार” असे लिहिण्यात आले होते. ज्यानंतर याबाबत गुरुवारी (ता. 29 मे) पुणे बार असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.

पण याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोहिणी खडसे यांनी स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, मी काल केलेल्या एका पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मला कळले. काल वैष्णवी हगवणेंच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले. पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्या तर तो हिंसाचार असू शकत नाही. त्यामुळे माझा महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींना आणि वकील बांधवांनाही प्रश्न आहे, की आपण या वक्तव्याचे समर्थन करू शकाल का? आपल्याला हे वक्तव्य पचत आहे का? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.

खडसे यांनी पुढे म्हटले आहे की, याच वक्तव्याचा ग्रामीण भागातील पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातील माता भगिनींना की हिंसाचार नाही म्हणत चार कानाखाली लगावल्या तर माझ्या त्या ग्रामीण भाघातील माता भगिनींना वाचवणार कोण? त्यांना रोज या हिंसाचारातून सामोरे जावे लागेल. त्यांना हा हिंसाचार सहन करावा लागेल. माझी नम्रपणे विनंती आहे सर्व वकील बांधवांना की, आपण या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. त्यामुळे आता याबाबत पुणे बार असोसिएशनकडून काय उत्तर देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा… Vaishnavi Hagawane : माझ्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे थांबवा, वैष्णवीच्या वडिलांनी केले कळकळीचे आवाहन





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.