Child Abuse Case : डॉक्टर वडिलाचा सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा रद्द करण्यास नकार
esakal May 30, 2025 06:45 PM

नवी दिल्ली : ‘‘माणूस मद्यप्राशन केल्यानंतर पशू होऊन जातो,’’ असे मत व्यक्त करत, सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टर पित्याची शिक्षा रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.

एका तज्ज्ञाने स्वतःच्याच सात वर्षांच्या मुलीवर नशेमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता, न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न आणि सतिशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने दोषी डॉक्टरला फटकारले.

‘‘तुम्ही तुमच्या मुलीशी असे कसे वागू शकता, ती तिच्या वडिलांच्या विरोधात खोटी साक्ष देईल का? तिला या प्रकरणी उलट तपासणीला सामोरे जावे लागले आहे. खरोखरच, माणूस, माणूस मद्यप्राशन केल्यानंतर पशू होऊन जातो,’’ असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदविले.

उदारमतवादी असूनही

यावेळी निकाल देताना सर्वोच्च खंडपीठाने दोषी ठरलेल्या डॉक्टरच्या वकिलाला सांगितले की, आम्ही हे आमच्याच तोंडाने सांगणे योग्य नाहीये पण, आमचे खंडपीठ हे सर्वांत उदारमतवादी म्हणून ओळखले जाते, असे असतानाही जर आम्ही याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत असू, तर या घटनेचे गांभीर्य समजावून घ्या. पीडित मुलीने दिलेली साक्ष तिला शिकवण्यात आली होती, असा दावा या वकिलाने केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला.

असे आहे प्रकरण

याप्रकरणी पीडितेच्या आईने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ती आणि तिचा पती विभक्त राहतात. तिचा पती हा हलद्वानी येथे प्रसूतिगृह चालवितो. त्याने २०१८मध्ये त्याने त्याच्या मुलीला हलद्वानी येथे पाठवून देण्यास सांगितले आणि आठ दिवसांनी तिला आईकडे पाठविले. पीडित मुलीने आईकडे गेल्यावर तिच्या वडिलांबद्दल तक्रार केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.