श्रीनगर : पाकिस्तानमधील चुलत बहिणीशी विवाह केल्याने केंद्रीय राखीव पोलिस दलातून (सीआरपीएफ) हकालपट्टी केलेला जवान मुनीर अहमद याने जम्मूतील उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे.
‘‘मीनल खान या पाकिस्तानमधील चुलत बहिणीशी विवाहाबाबत भोपाळमधील ४२ व्या बटालियन आणि राजौरीतील ७२ वी बटालियन या माझ्या आधीच्या व आताच्या बटालियनला मी पूर्वसूचना दिली होती,’’ असा दावा त्याने केला आहे. मुनीरचा विवाह २४ मे २०२४ रोजी ऑनलाइन झाला होता. लग्नाचे पुरावे म्हणून त्याने भारतीय निकाहनामा, पाक विवाह प्रमाणपत्र व लग्नपत्रिका सादर केली आहे.
मीनल यावर्षी २८ फेब्रुवारी रोजी अल्पकालीन व्हिसावर भारतात आली. तिने दीर्घकालीन व्हिसासाठी (एलटीव्ही) चार मार्च रोजी अर्ज केला आहे. याला अनेक खासदारांनी अनुमोदन दिले आहे. पण पहलगाम हल्ल्यानंतर मीनलला भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर, पाकिस्तानी नागरिकाला आश्रय दिल्याबद्दल आणि विवाह लपविल्याच्या आरोपाखाली मुनीरला ‘सीआरपीएफ’मधून निलंबित केले.
दावे-प्रतिदावे‘‘ही हकालपट्टी मनमानी आणि तऱ्हेवाईक असून राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत मूलभूत अधिकारांचे हे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद मुनीरने न्यायालयात केला. पत्नीचा व्हिसाचा दर्जा कायदेशीर होता आणि तिचा ‘एलटीव्ही’ अर्ज अजूनही विचाराधीन आहे, असा दावाही त्याने न्यायाालयात केला. राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि आचारसंहिता उल्लंघनाचा हवाला देत ‘सीआरपीएफ’ने जवान मुनीर अहमदला तत्काळ सेवेतून काढण्याचे समर्थन करण्यासाठी कलम ३११ चा वापर केला.