एड उपसंचालक लाचखोरी प्रकरणात अटक
Marathi June 01, 2025 12:33 AM

सीबीआयची ओडिशात कारवाई : प्रकरण मिटविण्यासाठी खाण व्यावसायिकाकडून 20 लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

ओडिशामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाचे उपसंचालक 20 लाख रुपयांची लाच घेताना जाळ्यात सापडले आहेत. सदर ईडी उपसंचालकाचे नाव चिंतन रघुवंशी असे आहे. रघुवंशी हे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी असून त्यांच्याविरुद्ध तक्रार आल्यानंतर सीबीआयने त्यांना सापळा रचून अटक केली. या प्रकरणामुळे देशभरातील आर्थिक गुन्हे आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांचा तपास करणाऱ्या ईडीसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सीबीआयने लाचखोरी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उपसंचालक चिंतन रघुवंशी यांना ओडिशात शुक्रवारी अटक केली. रघुवंशी भुवनेश्वरमधील एका खाण व्यावसायिकाकडून 20 लाख रुपयांची लाच घेणार असल्याची माहिती गुरुवारी एजन्सीला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयने घटनास्थळी पोहोचून 2013 बॅचचे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी रघुवंशी यांना अटक केली. मनी लाँड्रिंग (पीएमएलए) प्रकरण ‘निराकरण’ करण्याच्या बदल्यात ते एका व्यावसायिकाकडून लाच मागत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईडीचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांनी व्यावसायिकाकडून एकूण 5 कोटी रुपयांची लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर हा सौदा 2 कोटींमध्ये ठरला. शुक्रवारी त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 50 लाखांपैकी 20 लाख रुपये घेताना रघुवंशी यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उपसंचालक रघुवंशी यांनी पीडित व्यावसायिकाला मनी लाँड्रिंग प्रकरणात दिलासा देण्यासाठी आमिष दाखवले होते. त्या बदल्यात मोठी लाच मागितली गेली. व्यावसायिकाने पहिला हप्ता देताच सीबीआयने सापळा रचून त्यांना पकडले. सीबीआयने रघुवंशी यांना अटक केली असून आता त्यांची चौकशी सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.