IAS Savita Pradhan Struggle Story | जबरदस्ती लग्न, छळ ते IAS, एका एकल मातेची प्रेरणादायी कहाणी
Marathi June 02, 2025 03:26 PM

एका सामान्य आदिवासी मुलीला शिकायचं होतं. पण 17 व्या वर्षी एक श्रीमंत घरच स्थळ आलं त्यामुळे बळजबरी लग्न लाऊन दिलं, लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मारहाण आणि आणि छळ सुरू केला. मुलं झाल्यावरही छळ सुरूच राहिला. हिंसाचारामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला पण कशी तरी हिम्मत गोळा करून तिने घर सोडलं आणि पुढे खडतर परिस्थितीमध्ये तिने शिक्षण घेऊन 24 व्या वर्षी यूपीएससी पास केली आणि ती आयएएस झाली. ही प्रेरणादायी गोष्ट आहे. सविता प्रधान यांची. त्यांचा सगळा खडतर प्रवास ( Forced marriage, torture to IAS, an inspiring story of a single mother)

जबरदस्ती लग्न, हिंसाचार ते आत्महत्येचा प्रयत्न यावर IAS होऊन दिलं उत्तर…

मध्य प्रदेशच्या मंडई गावातून आलेल्या सविता प्रधान यांचा जन्म एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पण शिक्षणाची जिद्द त्यांच्या मनात होती. स्कॉलरशिपच्या मदतीने सविता यांनी दहावी पूर्ण केली आणि त्या आपल्या गावातील दहावी पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या, पण त्यांचा प्रवास इथेच थांबला नाही. पुढील शिक्षणासाठी त्यांना 7 किलोमीटर दूरच्या शाळेत प्रवेश मिळाला. त्यांच्या आईने फी भरण्यासाठी काहीकाळ नोकरी केली, जेणेकरून सविता यांचं शिक्षण थांबू नये.

विज्ञान शाखेतून शिक्षण घेणाऱ्या सविता यांचं स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं. पण वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात एक वळण आलं. एका श्रीमंत कुटुंबातून आलेल्या विवाहाच्या प्रस्तावामुळे त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना लग्न करावं लागलं. पण हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाची सुरुवात ठरला.

लग्नानंतर सविताला सासरच्या लोकांकडून आणि पतीकडून अनेक निर्बंध आणि घरगुती हिंसाचाराला सामोरं जावं लागलं. पतीकडून मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या यामुळे तिचं आयुष्य कठीण झालं. हसण्या बोलण्यावर आणि खाण्यापिण्यावर बंदि घातली आणि इतकंच नाही तर त्यांना तर काहीवेळा अंडरगारमेंट्स मध्ये पोळी लपवून धुवून खावी लागयची. दोन मुलं झाल्यावरही हा त्रास थांबला नाही. एकदा तर सविता यांनी हार मानली आणि आयुष्य संपवण्याचा विचार केला. त्या वेळेस त्यांच्या सासूने गळफास लावताना पाहिलं होतं पण तिने काहीही केलं नाही. आपल्या बद्दल कोणाला काही घेणे देणे नाही, आपला जीव जरी गेला तरी कोणाला काही फरक पडणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं. त्या तिथेच थांबल्या, आपल्या मुलांचा विचार करत त्यांनी हिम्मत गोळा केली आणि फक्त 2700 रुपये घेऊन मुलांसह सासर सोडलं.

सविता यांनी हार मानली नाही. मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी ब्युटी सलून सुरू केलं आणि मुलांना शिकवण्याचं कामही केलं. याचवेळी त्यांनी भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठातून पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बीएचं शिक्षण पूर्ण केलं. या काळात त्यांच्या माता-पित्यांनी आणि भावंडांनीही त्यांना साथ दिली.

या सगळ्या संघर्षादरम्यान सविता यांना राज्य सिव्हिल सर्व्हिस परीक्षेबद्दल समजलं. त्यांनी कठोर परिश्रम आणि दृढ निश्चयाने वयाच्या 24व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची मुख्य नगरपालिका अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पण सविता यांचं यश इथेच थांबलं नाही. अनेक पदोन्नती मिळवत त्या आयएएस अधिकारी बनल्या. सध्या त्या ग्वाल्हेर-चंबळ विभागासाठी शहरी प्रशासनाच्या संयुक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत.

सविता यांनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि दुसरं लग्न केलं. वैष्णवी हगवणे यांचं प्रकरण इतका गंभीर असताना सविता प्रधान यांची कहाणी प्रत्येक महिलेला एक प्रेरणा देते. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता स्वप्न पूर्ण करता येतात. त्यांनी दाखवून दिलं की, दृढ संकल्प आणि मेहनतीने कोणतीही उंची गाठता येते. सविता प्रधान या ‘हिम्मत वाली लड़कियां’ या यूट्यूब चॅनलद्वारे इतर महिलांना प्रेरणा देतात.

हेही पहा : Ajit Pawar : हे वादग्रस्त वक्तव्य मला महागात पडतंय, कोकाटेंच्या विधानावर अजित पवारही संतापले

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.