सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्या पॅनेलमध्ये झालेली लढत, शहराध्यक्षपदासाठी रोहिणी तडवळकर यांच्या नियुक्तीने ज्येष्ठ अन् इच्छुकांच्या मनावर झालेल्या जखमा या दोन घटनांनी सोलापुरातील भाजप सध्या अस्वस्थ आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजचा पूर्ण दिवस सोलापूरसाठी दिला. सोलापुरातील भाजपचा कानोसा घेत घेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आज रंजिता चाकोते यांनी केलेला आमरस, आमदार देवेंद्र कोठेंचा नाश्ता आणि जाता जाता आमदार सुभाष देशमुखांच्या घरी जाऊन चहा पचविला, हे विशेष.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे आज सोलापुरात आगमन झाल्यापासून ते नियोजन भवनातील बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, आमदार सुभाष देशमुखांच्या घरी जाऊन चहापान, यासह स्थानिक कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत आमदार कोठेंनी दिलेली साथ अनेकांच्या नजरेत भरली. आमदार विजयकुमार देशमुख हे हैदराबादला असल्याने तर आमदार सचिन कल्याणशेट्टी हे केरळला असल्याने आजच्या दौऱ्यात दिसले नसल्याचे समजते. या दोघांचेही दौरे आधीच ठरले होते, त्यांची माझ्याशी चर्चा झाल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकारांचे समाधान केल्याचे दिसले.
सोलापुरातील मूळ भाजप म्हणून ओळख असलेले कार्यकर्ते व सध्या सक्रिय राजकारणापासून दूर असलेले कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यात प्रकर्षाने दिसले. माजी महापौर किशोर देशपांडे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेविका मोहिनी पत्की, नव्याने भाजपत आलेल्या रंजिता चाकोते यांच्यासह नव्या-जुन्या भाजप कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीसाठी आमदार देवेंद्र कोठे यांचे संपर्क कार्यालय व निवासस्थान हे माध्यम ठरल्याने भाजपच्या राजकारणात कुजबूज सुरू झाली आहे.
आमदार सुभाष देशमुख सोलापुरात आहेत परंतु कुठेच आले नाहीत, हे जाणवल्यावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी होटगी रोडच्या विमानतळाकडे जाता जाता आमदार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांचा सत्कार ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांनी केला. यावेळीही आमदार देवेंद्र कोठे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण व चेतनसिंह केदार-सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार देशमुखांचा चहा घेऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी होटगी रोड विमानतळावरून विमानाने जात सोलापूरला बाय-बाय केले.
दौरा झाला पण प्रश्न तसेचसोलापूर भाजपसाठी बाजार समिती निवडणूक आणि शहराध्यक्ष निवड या दोन घटना महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या दोन्ही घटनांमधील प्रमुख कर्ते करविते आज प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात आमने-सामने आलेच नाहीत. त्यामुळे सध्या सोलापुरात भाजपमध्ये ‘एक है तो सेफ है’चे चित्र आहे का? या बद्दल कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम कायमच राहिला आहे. प्रदेश भाजप ही नाराजी/मनभेद/मतभेद कसे दूर करणार? या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
मोहिते-पाटील गेल्यावर सातपुते भेटलेलोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात काम केल्याप्रकरणी भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपने खूप महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. या नोटिसचा फैसला होण्याच्या आतच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पक्ष नोंदणीबद्दल आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे लेखी अभिनंदन केले होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यात आमदार मोहिते-पाटील आज नियोजन भवनातील बैठकीत दिसले. ही बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हेरिटेज येथील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी गेले. बैठकीला असलेले मोहिते-पाटील हेरिटेजमध्ये दिसले नाहीत. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते मात्र त्या ठिकाणी आवर्जून हजर होते. त्या ठिकाणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट घेतली.
मंत्री चंद्रकांत पाटलांचाही सेम पॅटर्नप्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आजच्या सोलापूर दौऱ्यात भाजप नेत्यांच्या भेटी-गाठी साठी जो पॅटर्न राबविला. तोच पॅटर्न शनिवारी (ता. ३१) उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील राबविणार असल्याचे दिसते. शनिवारच्या दौऱ्यात मंत्री पाटील यांनी आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहराध्यक्ष सौ. रोहिणी तडवळकर यांच्या निवासस्थानी भेट देण्याचे नियोजन केले आहे. शहराध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये खदखद, नाराजी दिसत असली तरीही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आजच्या सोलापूर दौऱ्यात या निवडीचे समर्थन केले आहे. संघटनेत निर्णय एकमताने होतात, हा देखील निर्णय एकमतानेच झाला आहे. आमदार आणि संघटनेतील पदे ही पक्षाची दोन चाके आहेत. या दोन्ही चाकांना व्यवस्थित हताळून आम्ही अधिक वेगाने पुढे जात असल्याचेही उदाहरण प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिले.