नागपूर : जरीपटका येथील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेच्या भागधारकांकडून ठेवी घेत, गैरवापर करून ग्राहकांची साडेचार कोटी रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी लेखापरीक्षक नारायण धनपतराव गाधेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि पिग्मी एजंट अशा २१ जणांविरोधात जरीपटका पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत, संचालक रवींद्र धर्मदास मेश्राम, दुर्योधन सोनू डहारे, भगवान विठ्ठल नन्नावरे, छाया मयूर मेश्राम, संजय दशरथ गजघाटे, गौतम दौलत गेडाम, राजेश पुरुषोत्तम मांजरे, नरेश सोमकुंवर, प्रदीप मेश्राम, नरेंद्र नामदे शेंडे, अचल मनुराज रामटेके, मिलिंद लांजेवार, प्रमोद वासनिक, प्रवीण रामचंद्र मेश्राम, संजय माणिकराव जैस्वाल, संगीता संजय थुल, नंदीनी अजयकुमार गौतम, विरेशकुमार वरखेडे, मनोज भीमराव गजभिये, शशीकांत नारनवरे अशी आरोपींची नावे आहेत.
इंदोरा परिसरात उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेच्या एजंटच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे खाते सुरू करण्यात आले. अनेकांनी ठेवी ठेवल्या. मात्र, या ठेवी आणि खात्यातील पैशाचा गैरवापर करून त्याच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनावट नोंदी करून नियमबाह्यपणे एजंटची नियुक्ती करून अवास्तव कमिशन देण्यात आले. याशिवाय व्यवस्थापनातील सदस्यांनी अवास्तवर प्रशासकीय खर्च करणे, ठेवीच्या रकमेचा परतावा न देणे असे अनेक गैरव्यवहार केले.
संस्थेच्या कामाचा २०१९ ते २०२३ या दरम्यान अप्पर विशेष लेखापरीक्षकाने लेखा परीक्षण केल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी दिलेल्या अहवालावरून संस्थेचे अध्यक्ष आणि संचालकांनी ४ कोटी ५४ लाख ६८ हजार २३७ रुपयांचा गैरप्रकार केल्याची माहिती समोर आली. त्यातून त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.