MPL 2025: हे पाच 'वॉरियर्स' लढवणार साताऱ्याचा किल्ला, पहिल्या वर्षीच विजेतेपदाचे लक्ष्य
Marathi June 01, 2025 04:24 AM

एमपीएल 2025 मध्ये यावेळी सातारा वॉरियर्स (Satara Warriors) संघ प्रथमच सहभागी होता. छत्रपती संभाजी किंग्स संघाने माघार घेतल्यामुळे या संघाला संधी मिळाली. बरेचशे खेळाडू छत्रपती संभाजी किंग्स संघातील असल्याने एक चांगले वातावरण संघात दिसते. मात्र, या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी या पाच खेळाडूंनी आपली योग्यता दाखवणे गरजेचे असेल.

राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangrgekar)- पहिल्या दोन हंगामात छत्रपती संभाजी किंग्सचा आयकॉन खेळाडू असलेला राजवर्धन कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतो. वेगवान गोलंदाजी आणि तुफानी फटकेबाजी असे दोन्ही कौशल्ये त्याच्याकडे आहेत. अंडर 19 भारतीय संघ व आयपीएलचा अनुभव त्याच्या पाठीशी असून, तो संघासाठी उपयुक्त ठरेल. पहिल्या दोन हंगामात त्याने चांगले कामगिरी केली होती. मात्र, यावेळी या कामगिरीत सातत्य ठेवण्याचे आवाहन त्याच्यापुढे असेल.

ओम भोसले (Om Bhosale)- छत्रपती संभाजी किंग्स संघासाठी एमपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा बनवणारा ओम भोसले यावेळी सातारा संघासाठी खेळेल. तसेच, त्याने मागील हंगामात दुसऱ्या सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. सलामीला फलंदाजीला येऊन आक्रमक व संयम असा दुहेरी खेळ तो दाखवू शकतो. त्यामुळे संघाच्या फलंदाजीची मोठी भिस्त त्याच्यावर असणार आहे.

पवन शहा (Pavan Shah)- अत्यंत गुणवान समजला जाणारा सलामीवीर पवन शहा सातारा वॉरियर्स संघासाठी खेळताना दिसेल. यासोबतच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली गेली आहे. एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामात त्याने पुणेरी बाप्पा संघासाठी दमदार कामगिरी केली होती. तिसऱ्या हंगामात सातारा संघासाठी तशीच कामगिरी तो करतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मेहुल पटेल (Mehul Patel)- एमपीएल 2024 मध्ये रायगड रॉयल्ससाठी मेहुल पटेल याने आक्रमक फटकेबाजी केली होती. सातारा संघाला आपल्या पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घालायची असल्यास, मेहुल याची मध्यफळीतील फलंदाजी कामी येईल. सलामीवीरांनी मोठी भागीदारी केल्यानंतर गरज पडल्यास अखेरच्या टप्प्यात मोठे फटके खेळून संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी त्याच्याकडे असणार आहे.

विवेक शेलार (Vivek Shelar)- दुसऱ्या हंगामात पुणेरी बाप्पासाठी खेळलेला वेगवान गोलंदाज विवेक शेलार यावेळी सातारा वॉरियर्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करेल. लिलावात दुसरी सर्वात मोठी किंमत विवेकला मिळाली आहे. टेनिस क्रिकेटमधून नाव कमावल्यानंतर सातत्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये तो आपली कामगिरी उंचावताना दिसतोय. त्याची हीच कामगिरी कायम राहिल्यास सातारा आपला पहिल्या हंगामात मोठी कामगिरी करू शकतो.

एमपीएल 2025 सोबत प्रथमच डब्ल्यूएमपीएल (WMPL) ही महिलांची टी20 लीग देखील होणार आहे. अशाप्रकारे लीग आयोजित करणारी एमसीए देशातील पहिली राज्य क्रिकेट संघटना आहे. या दोन्ही स्पर्धा पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जातील. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना कोणत्याही तिकीटाविना प्रवेश दिला जाईल. JioHotstar OTT आणि Star Sports 2 टीव्ही चॅनलवर या स्पर्धा पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.