Nilesh Chavan Update: मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाण नेपाळमध्ये कसा पोहोचला? नवीन माहिती समोर
esakal May 31, 2025 12:45 AM

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेला निलेश चव्हाण याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. तो २१ मेपासून फरार होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र तो नेपाळमध्ये पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत माहिती समोर आली आहे.

निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद हगवणेचा मित्र आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या १० महिन्यांच्या बाळाची जबाबदारी त्याच्याकडे होती. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी बाळाला परत मागितल्यावर, त्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना हाकलून लावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वैष्णवीच्या सासरच्या हगवणे कुटुंबातील सदस्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेजवळून ताब्यात घेतलं आहे. आता लवकरच पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे. निलेश चव्हाणवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या शोधासाठी मोठी शोधमोहीम राबवण्यात आली होती. निलेश चव्हाणच्या तपासासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची ४ पथकं रवाना करण्यात आली होती. तर दुसरीकडे पुणे पोलिसांची ३ पथकं त्याचा शोध घेत होती. महाराष्ट्रात आणि इतर राज्यात त्याचा शोध सुरू होता. त्याच्या विरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती.

अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याचा फोटोही समोर आला आहे. निलेश चव्हाण महाराष्ट्रातून दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांमधून नेपाळला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करून त्याला सीमेवरून ताब्यात घेतले आहे. आता निलेश चव्हाणला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे.

निलेश पुणे, कर्जत, रायगड दिल्ली गोरखपूर, सोनाली ( युपी ) बहिरवाह (नेपाळ) काठमांडू, सोनाली ( युपी ) या मार्गाने नेपाळमध्ये गेला होता. आता वारजे माळवाडी पोलिसांकडून आता पुढील गुन्ह्याचा तपास, चौकशी, आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे मिळवण्याचं काम होणार आहे. निलेश चव्हाणच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला पुण्यात आणले जाईल. यानंतर पुढील तपासासाठी त्याची चौकशी सुरू होईल. या अटकेमुळे प्रकरणात आणखी तपशील उघड होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.