कसबा सांगाव: सकाळ इंपॅक्ट, कालव्याच्या पर्यायी रस्त्यावर मुरुमाचा लेप
esakal May 31, 2025 12:45 AM

1820
कसबा सांगाव ः येथे कालव्याच्या कच्च्या रस्त्यावर पुन्हा एकदा मुरुमाची मलमपट्टी केली आहे. (छायाचित्र : कृष्णात माळी)
...........
लोगो ः सकाळ इंपॅक्ट

कसबा सांगाव कालव्याच्या
पर्यायी रस्त्यावर डागडुजी

वाहनधारकांना तात्पुरता दिलासा

सकाळ वृत्तसेवा
कसबा सांगाव, ता. ३० ः मॉन्सूनपूर्व पावसामुळे येथील दूधगंगा डाव्या कालव्यावरील पर्यायी कच्च्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे वाहतूक धोकादायक बनली होती. चिखल आणि वर आलेल्या दगडधोंड्यांमुळे ‘प्रवासी घेताहेत डर्ट ट्रॅकचा अनुभव’ अशा आशयाची बातमी ‘सकाळ’मध्ये मंगळवारी (ता. २७) प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने पुन्हा एकदा मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि वाकी वसाहतीच्या मध्यभागी दूधगंगा डावा कालवा खोदला आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दूधगंगा कालवे प्रकल्प एककडून कालव्याच्या खालून पाण्याच्या प्रवाहासाठी बोगदा तयार करण्याच्या कामाचा यात समावेश आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून हे काम रखडले आहे. सीमाभाग आणि परिसरातील अनेक महिला, पुरुष कामगार याचमार्गे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे येत असतात. या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे कसबा सांगावमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मॉन्सूनपूर्व पावसामुळे कच्चा रस्त्यावर पाण्याचे तळे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामुळे हा रस्ता धोकादायक बनला होता. रस्त्यावर आलेल्या दगडधोंड्यांमुळे वाहनांचे आणि सततच्या धक्क्यामुळे वाहनधारकांची हाडे खिळखिळी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ''सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.