सकाळ वृत्तसेवा
मुंबई : पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना बढती देण्याचा " प्रताप " एसटी महामंडळाने करून दाखवला आहे. याबरोबरच काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना राजकीय दबावापोटी महामंडळातील मोक्याच्या पदावर नियुक्त करण्याचा घाट देखील सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक आर्थिक व्यवहार झाल्याची देखील खमंग चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
एसटीमध्ये जून आणि डिसेंबर महिन्यात प्रशासकीय बदल्या व बढत्या केल्या जातात. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बदलीचे ॲप तयार झाल्याशिवाय कोणत्याही बदली करू नयेत असे एसटी प्रशासनाला तोंडी आदेश दिले आहेत. परंतु काही महत्त्वकांक्षा अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव आणून आपली बढती करून घेतली आहे.
विशेष म्हणजे त्यापैकी एका अधिकाऱ्याची पोलिसांच्या मार्फत आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी सुरू आहे. तसेच एका अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना बढती देऊन त्यांना जास्त अधिकार दिल्यामुळे भ्रष्टाचार आणि अनियमिततेला पाठिंबा दिल्यासारखे आहे.
एवढेच नाही तर काही सेवानिवृत्त अधिकारी राजकीय दबावाचा फायदा घेऊन आपली महामंडळाच्या लाभाच्या पदावर पूर्णस्थापना करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबरोबरच काही अधिकाऱ्यांची सुरक्षा विभागामार्फत चौकशी करून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. अशा अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे बदली देण्यासाठी आर्थिक व्यवहार सुरू असल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे.
दुर्दैवाने सेवाजेष्ठतेनुसार आपली आज ना उद्या बदली होईल, या प्रतिक्षेत असलेल्या आणि ऑनलाइन बदल्यामुळे समान हक्क मिळवण्याच्या आशेवर बसलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अशा कार्यपद्धतीची चीड येणे स्वाभाविक आहे.
बदली आणि बढती साठी सर्वसामान्य कर्मचारी व अधिकारी वर्षानुवर्षे वाट पाहत असताना अशा प्रकारे भ्रष्ट आणि अनैतिक पद्धतीने आपले इपसित साधून घेणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या एसटी प्रशासनावर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
एखाद्या अधिकाऱ्याची खुली चौकशी सुरु असेल, तर त्यांना बढती देता येत नाही असा निकष आहे. परंतु याचे उल्लंघन केले असेल तर याबाबत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना जाब विचारण्यात येईल.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री