IPL 2025 beat Gujarat Titans Marathi Update : मुंबई इंडियन्सने दोनशेपार धावा केल्यानंतर एकही सामना गमावलेला नाही आणि तेच आजही झाले. आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर लढतीत २२८ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने कडवी टक्कर दिली होती. पण, ते २० धावांनी कमी पडले आणि मुंबईने बाजी मारली. साई सुदर्शन व वॉशिंग्टन सुंदर मैदानावर असेपर्यंत सामना गुजरातच्या पारड्यात होता, परंतु कर्णधार हार्दिक पांड्याने हुकमी एक्का काढला अन् मॅच फिरली...
रोहित शर्माच्या ५० चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांच्या खेळीने मुंबईला मजबूत धावसंख्या उभारून दिली. जॉनी बेअरस्टोने २२ चेडूंत ४७ धावांची खेळी करून मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादव ( ३३), तिलक वर्मा ( २५) व हार्दिक पांड्या ( २२) यांच्या खेळीने मुंबईला २० षटकांत ५ बाद २२८ धावांपर्यंत पोहोचवले. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा व साई किशोर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला १ विकेट मिळाली. प्रसिद्धने ४ षटकांत ५३, तर गेराल्ड कोएत्झीने ३ षटकांत ५१ धावा दिल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल १ धावेवर बाद झाला. पण, साई सुदर्शन व कुसल मेंडिस ( २०) यांनी ६४ धावा जोडताना GT ला विजयाच्या शर्यतीत ठेवले. मेंडिस हिटविकेट झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने दमदार खेळ केला. सुदर्शन व सुंदर यांनी ४४ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. सुंदर २४ चेंडूंत ४८ धावांवर त्रिफळाचीत झाला. ही जोडी मैदानावर असेपर्यंत गुजरातला विजयाच्या आशा होत्या. पण, ही जोडी तोडण्यासाठी हार्दिकने प्रमुख गोलंदाज ला आणले आणि त्याने भन्नाट यॉर्करवर सुंदरचा त्रिफळा उडवला.
त्यानंतर गुजरातला प्रयत्न करूनही मॅच जिंकता आली नाही. गुजरातला ६ बाद २०८ धावांपर्यंत पोहोचता आले आणि मुंबईने २० धावांनी सामना जिंकला. मुंबईने आयपीएलमध्ये १८ वेळा २०० पार लक्ष्य ठेवले आणि ते सर्व सामने जिंकलेही. जसप्रीत बुमराहने घेतलेली सुंदरची विकेट ही या सामन्याला कलाटणी देणारी ठरली. जस्सीने ४ षटकांत २७ धावा देताना १ विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सला क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्सचा सामना करावा लागणार आहे. १ जूनला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही लढत होईल. ३ जूनला याच मैदानावर फायनल होणार आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जेतेपदाचा सामना कोण खेळेल हे MI vs PBKS सामन्यानंतर स्पष्ट होईल.