Kolhapur Friends : चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक आणि उसाची रोपे घेऊन जाणारी मोटार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात शिरोळ तालुक्यातील दोघे मित्र ठार झाले, तर या दोन्ही वाहनांतील अपघातग्रस्त लोकांना मदतीसाठी गेलेल्या आणखी एकाला मोटारीने उडविल्याने तोही ठार झाला. हा अपघात कागवाड-विजापूर मार्गावर अथणीजवळील बनजवाड महाविद्यालयाजवळ गुरुवारी (ता. १२) मध्यरात्रीनंतर घडला. त्यात चौघे जखमी झाले आहेत. शुभम युवराज चव्हाण (वय २४, रा. कुटवाड, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (३०, रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) आणि सचिन विलास माळी (४२, रा. कवलापूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अथणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी - रत्नागिरीहून चिरा भरून विजापूरकडे ट्रक जात होता, तर अथणीहून कागवाडकडे उसाची रोपे भरून जाणारी मालवाहतूक मोटार जात होती. मध्यरात्री अथणी भागात मोठा पाऊस कोसळत होता. त्यामुळे या दोन्ही वाहनांना समोरचे दिसले नसावे. त्यामुळेच दोन्ही भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाली. अवजड वाहतुकीचा असूनही ट्रक रस्त्यावरून खाली उतरून शेतात उलटला, तर मोटारीचाही चक्काचूर झाला. त्यातील रोपे रस्त्यावर विखुरली. अपघातात शुभम चव्हाण व महेश गाताडे जागीच ठार झाले.
अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका मोटारीतील चालकाने वाहन थांबविले. या वाहनातून उतरून चालक अपघातग्रस्त वाहनांकडे जाताना अथणीहून कागवाडकडे जाणाऱ्या मोटारीने त्या मदतीसाठी जात असलेल्या चालकाला धडक दिली. या धडकेत मदतीसाठी जात असलेला सचिन माळी हाही जागीच ठार झाला. रस्ता पार करून जाताना त्याला मोटारीने उडविले. हे दृश्य पाहून सचिन माळी यांच्या मोटारीतील सहप्रवाशांनी धाव घेतली.
मध्यरात्री चार वाहनांच्या मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मोटारीतील चौघे जखमी झाल्याने त्यांना अथणी येथील सरकारी रुग्णालयात विविध वाहनांतून दाखल करण्यात आले. घटनास्थळी अथणीचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उप्पार व पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले. तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. रात्री मोठा पाऊस असल्याने वेळेत मदत मिळू शकली नाही.
पोलिसांनी पावसातच स्थानिकांची मदत घेऊन बचाव कार्य करत जखमींना हलविले. पहाटेपर्यंत मदत कार्य सुरू होते. तिघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
शिवम, महेश कष्टकरी कुटुंबातील
कुटवाड (ता. शिरोळ) येथील शिवम युवराज चव्हाण व त्याच्या आई-वडिलांनी अत्यंत गरिबीतून व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचा चारचाकी पिकअप ट्रक घेऊन मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता. शिवम याचे वडील ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करतात. त्याची आई रोपवाटिकेमध्ये मजुरी करतात.
शिवम याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. अपघाती निधनाची माहिती समजतात आई-वडिलांसह पत्नीने हंबरडा फोडला. गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील महेश सुभाष गाताडे बदली चालक म्हणून काम करीत होते. शिवम यांच्याशी त्यांची मैत्री होती. शिवम कष्टाळू होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.