पुण्यात ड्रंक ऍण्ड ड्राइव्हचा थरार, भरधाव कारने 12 जणांना उडवले; 6 विद्यार्थी जखमी
Marathi June 01, 2025 09:25 AM

पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ शनिवारी सायंकाळी ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची थरारक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने भरधाव वेगाने कार चालवित टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलेल्या बारा जणांना उडविले. जखमींमध्ये 6 एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. तिघांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कारचालक जयराम मुळे आणि कारचा मालक दिगंबर यादव शिंदे यांना अटक केली. तर, सहप्रवासी राहुल गोसावी याला ताब्यात घेतले.

सदाशिव पेठेत एमपीएसचे क्लासेस असून या परिसरात राज्यभरातील विद्यार्थी वास्तव्याला आहेत. हे विद्यार्थी सायंकाळी चहा पिण्यासाठी अभ्यासिकेतून बाहेर पडतात. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी नेहमीच गर्दी असते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी भावे स्कूलशेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर काही विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक चहा घेत उभे होते. त्यावेळी अचानक भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना उडविले. चालकाला गाडी चालवता येत नव्हती. त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट नागरिकांमध्ये घुसली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने संचेती रुग्णालय आणि जवळील मोडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज एमपीएससी गट‘क’चा पेपर

एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षा (गट-क) चा आज (1 जून) रोजी पेपर होणार असून, लाखो विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. त्यासाठी अनेक विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात.  मात्र, अचानक झालेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.