गाणी ऐकल्याने मन शांत होण्यास मदत होते. त्यामुळे आपण बरेचजण मॉर्निंग वॉकपासून ते अगदी बेडवर झोपेपर्यंत इयरफोन घालणारे आसपास पाहतो. गाणी ऐकणे मानसिक आरोग्यासाठी वरदान समजले जाते. त्यामुळे दिवसभराची दगदग करून रात्री शांत झोप लागावी यासाठी बहुतेकजण झोपताना इयरफोन लावत गाणी ऐकतात. काहींची तर ही रोजची सवय झाली आहे. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? रात्री हेडफोन किंवा इयरफोन लावून गाणी ऐकत झोपणे हानिकारक ठरू शकते. मानसिक स्वास्थासाठी संगीत वरदान असले तरी इयरफोन घालून गाणी ऐकण्याची सवय आरोग्यासाठी विविध समस्या घेऊन येणारी ठरू शकते. आजच्या लेखात जाणून घेऊयात झोपताना इयरफोन घालण्याचे दुष्परिणाम काय आहेत.
झोपेत अडथळा –
जर तुम्ही रात्रभर इयरफोन घालून गाणी ऐकत झोपलात तर तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे मेंदू पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. परिणामी, तुम्हाला गाढ झोप लागत नाही आणि सतत जाग येते.
कानांवर परिणाम –
रात्रभर कानात इयरफोन घालून झोपल्याने मेंदूतील काही भाग ऍक्टिव्ह राहतो आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे कानांवर वाईट परिणाम होतो. कान खराब होऊ शकतात. ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
ताणतणाव –
मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने मेंदू शांत होत नाही, यामुळे मेंदूला आराम मिळत नाही. परिणामी, ताण वाढून चिडचिडेपणा वाढू शकतो.
रेडिएशनचा धोका –
झोपताना मोबाईल किंवा ब्युटूथ डिव्हाइस जवळ असल्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड रेडिएशनचा धोका वाढतो. या रेडिएशन्स मेंदूच्या पेशींवर परिणाम करतात. ज्यामुळे मेंदूला आराम मिळत नाही.
झोपेचे चक्र बिघडते –
झोपताना स्मार्टफोन जवळ असल्याने गाढ झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन हार्मोन कमी होते, ज्यामुळे तुमच्या झोपेचे चक्र बिघडू शकते.
अचानक दचकणे –
कधीकधी इयरफोन खराब असतील तर अचानक मोठा आवाज येतो. ज्यामुळे तुम्हाला झोपेत दचकून जाग येऊ शकते. विशेष करून ही गोष्ट लहान मुलांसाठी आणि कमकुवत हृदय असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकते.
असे सर्व असले तरी झोपताना संगीत ऐकण्याचे अनेक फायदे देखील आहेत. संगीत तुमची मेमरी स्ट्राँग करते. संगीत ऐकल्याने मन शांत होते. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतो, ज्यामुळे ताणतणाव दूर होतो. झोपताना शांत गाणी ऐकल्याने मेंदू शांत होतो आणि तुम्हाला गाढ आणि शांत झोप लागते. त्यामुळे झोपताना इयरफोन वापरण्याऐवजी बाहेर ऐकू शकता.
हेही पाहा –