Nilesh Chavan Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Death Case) निलेश चव्हाण (Nilesh Chavan) हा त्याच्या मैत्रिणीमुळे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण पुण्यातून पसार झाला तेव्हापासून त्याची मैत्रीण त्याच्यासोबत होती. आपण फिरायला जाऊ असं त्याने त्याच्या मैत्रिणीला सांगून तिला सोबत ठेवलं आणि तिच्या फोनचा वापरही केला.
पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशने मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर प्राप्त झाला. तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली, परंतु तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलं. मात्र तिच्याकडून दिल्लीतून गोरखपूरचा प्रवास केलेल्या खासगी बसची माहिती मिळाली आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या घातल्या.
निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घराची दीड तास झाडाझडती घेतली. तपासात शशांक, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांचा मोबाईल बावधन पोलिसांनी जप्त केलं. एकूण तीन मोबाईलसह इतर काही इलेक्ट्रॉनिक गॅजेटदेखील बावधन पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तपासाचा भाग म्हणून निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्डदेखील पोलीस तपासणार आहेत. तसेच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त करण्यात आले आहे.
– पैशांची देवाण-घेवाण करताना ऑनलाईन ट्रान्झिक्शन केलं तर पोलिसांना लोकेशन कळेल म्हणून पुणे सोडताना त्याने लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली.
– सोबत 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले. काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले.
– नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले.
– प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिमकार्ड घालून वापर करायचा.
– संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला.
– ऑनलाईन कॉलिंगवरुन अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांशी संवाद साधत होता.
– अनेकदा फोन बंद पडल्याचे बहाणे करत, त्या-त्या ठिकाणच्या व्यक्तींच्या फोनचा आणि वाय-फायचा वापर केला.
– सीसीटीव्हीच्या साह्याने पोलीस आपल्यापर्यंत पोहचतील, म्हणून स्वतःच्या ऐवजी खाजगी वाहनाने प्रवास केला.
हगवणे कुटुंबाचा आणखी एक हावरटपणा समोर आला आहे. वैष्णवीच्या लग्नात दीड लाखाचा रुखवत देण्यात आला होता, अशी माहिती वडील अनिल कस्पटेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना दिलीय. शशांक हगवणेची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हा रुखवत बनवल्याचं कस्पटेंनी सांगितलं. वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्माने, आमच्या पाहुण्या सुपेकरांकडून रुखवत बनवून घ्या असं कस्पटेंना सांगितलं होतं आणि त्यानंतरच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आली होती. वैष्णवीच्या लग्नातील रुखवताचे 1 लाख रुपये चेकने, तर 50 हजार रोख देण्यात आले होते.
https://www.youtube.com/watch?v=A9I9BIWK1H4
अधिक पाहा..