MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) ची सुरुवात 4 जून पासून होईल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा पुढील 20 दिवस चालेल. या यशस्वी स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामात अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत ओळख बनवली होती. या हंगामात देखील असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यावर सर्वांची नजर असेल. आज आपण एमपीएल 2025 मध्ये चमकू शकणाऱ्या चार युवा खेळाडूंविषयी जाणून घेऊया.
हर्ष मोगावीरा (Harsh Mogaveera)- रायगड जिल्ह्यासाठी खेळणारा डावखुऱ्या हातात स्टायलिश फलंदाज हर्ष मोगावीरा प्रथमच एमपीएलमध्ये उतरताना दिसेल. एप्रिल महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात त्याच्यासाठी अनेक संघ इच्छुक दिसत होते. अखेर रायगड रॉयल्सने 3 लाखांची बोली लावत त्याला आपल्याकडे खेचले. हर्ष हा महाराष्ट्र क्रिकेटचे भविष्य असल्याचे सांगितले जाते. सिद्धेश वीर याच्यासोबत तो रायगड संघासाठी सलामीला उतरताना दिसण्याची शक्यता आहे.
रोहन खरात (Rohan Kharat)- पुणेरी बाप्पा संघासाठी एमपीएल 2024 मध्ये फिरकीपटू रोहन खरात मैदानात उतरला होता. अखेरच्या दोन सामन्यात त्याला संधी मिळालेली. आपल्या पहिल्या सामन्यात तीन बळी घेत तो सामनावीर ठरलेला. टेनिस क्रिकेटमध्ये नाव कमावल्यानंतर तो सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत आहे. त्याच्या मिस्ट्री स्पिन पुढे अनेक उत्कृष्ट फलंदाज चकताना दिसलेले आहेत. त्यामुळे आपल्या दुसऱ्या हंगामात पूर्ण संधी मिळाल्यावर, रोहन दमदार कामगिरी करू शकतो.
सनी पंडित (Sunny Pandit)- रोहन खरात याच्याप्रमाणेच सातारा वॉरियर्सचा सनी पंडित हा देखील मिस्ट्री स्पिनर म्हणून एमपीएलमध्ये सहभागी होईल. हिंगोली जिल्ह्यासाठी खेळणारा सनी 60 हजारांच्या किमतीत सातारा संघाचा भाग झाला आहे. आपल्या लेग स्पिनने एमपीएल 2025 मध्ये धुमाकूळ घातल्यास पुढील हंगामात त्याची किंमत आणखी वाढू शकते.
सुश्रुत सावंत (Sushrut Sawant)- महाराष्ट्राचे व देशाचे वयोगट क्रिकेट गाजवणारा उजव्या हाताचा फलंदाज सुश्रुत सावंत प्रथमच एमपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. ईगल नाशिक टायटन्स संघाने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संधी दिली. सुश्रुत याची बीसीसीआयच्या अंडर 19 शिबिरासाठी निवड झाली होती. त्यामुळे यावेळी सुश्रुत याला मैदानात उतरण्याची संधी मिळाल्यास, तो आपल्या फलंदाजाने क्रिकेटप्रेमींना आनंद साजरा करण्याचा मौका देऊ शकतो.
आ. रोहित पवार (Rohit Pawar) अध्यक्ष असलेली महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही स्पर्धा आयोजित करत असते. या स्पर्धेतील सामने गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विना तिकीट पाहता येतात. यावर्षी एमसीएने प्रथमच महिलांसाठी WMPL सुरू केल्याने, क्रिकेटप्रेमींना क्रिकेटचा डबल डोस मिळेल. या दोन्ही स्पर्धांचे थेट प्रक्षेपण ओटीटी प्लॅटफॉर्मवर JioHotstar व टेलिव्हिजनवर Star Sports 2 चॅनेलवर होईल.
(एमपीएल 2025 जिओहोटस्टार ओटीटी आणि स्टार स्पोर्ट्स 2 टीव्ही चॅनेलवर थेट टेलिकास्ट)