Chandrashekhar Bawankule : मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत नुकसानभरपाईचा निर्णय; चंद्रशेखर बावनकुळे, स्थानिक निवडणुका एकत्रच
esakal June 01, 2025 04:45 PM

नागपूर : महाराष्ट्रात एक महिना आधीचा पाऊस आल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणात भरपाईकरिता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय प्राधान्याने घेण्याचे ठरवले असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

गेल्या मंत्रिमंडळातही यावर सविस्तर चर्चा झाली आहे. केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह राज्य सरकारच्याही नियम असतात. पुढच्या कॅबिनेट बैठकीपर्यंत संपूर्ण राज्यात काय नुकसान झाले याचा सविस्तर आढावा मंत्रिमंडळात येईल. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेला नुकसान भरपाई दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या निकषासारखेच राज्य सरकारचे निकष आहेत. फक्त या ठिकाणी अधिक लोकांना मदत मिळावी या उद्दिष्टाने तीन हेक्टरवरून मर्यादा दोन हेक्टर करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीड हजार रुपये महिन्याकरिता सरकारी सेवेत असलेल्या नोकरदार बहिणींनी असे करायला नको होते. मिळालेले लाभ परत करायला पाहिजे. शासन वसुली करेलच. काही खात्यांनी चौकशी करून वसुली सुरू केली आहे. यानंतरही कोणी शासकीय कर्मचारी फायदा लाटत असतील तर त्यावर कारवाई नक्की होईल असेही बावनकुळे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार.

कारण निवडणुका झाल्यावर एकत्रच काम करायचा आहे. त्यामुळे कुठे युती झाली नाहीच तर मैत्रीपूर्ण लढू असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता पांदण रस्ते मजबूत करावे याकरिता महाराष्ट्र सरकार ते रुंद करण्याचे ठरवले आहे. सर्व रस्ते मुरमाचे होणार आहेत. सरकार पांदण रस्त्याकडे कडे दुर्लक्ष करणार असेही बावनकुळे म्हणाले.

सर्वसामान्यांना मिळावी परिपूर्ण वैद्यकीय सुविधा

नागपूर : नागपूरमधील शासकीय रुग्णालयांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्प हाती घेतले असून शासकीय दंत रुग्णालयातील ही अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर राज्यातील पहिली उपलब्धी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील अत्याधुनिक शस्त्रक्रियागाराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, दंतचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पंदीलवार, डॉ.वैभव कारेमोरे आदी यावेळी उपस्थित होते.

सिम्युलेशन लॅब

सिम्युलेशन लॅबमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था आहे. यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव कौशल्यात वृध्दी करुन घेता येईल. देशातील अत्याधुनिक अशी पहिली सिम्युलेशन लॅब म्हणून याकडे पाहिले जात आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ही नवी उपलब्धी आहे. यात आवश्यक तेवढे एक्स-रे आणि दंत प्रक्रिया शिकण्यास मदत होईल. विशेषत: येथील आधुनिक उपकरणाच्या मदतीने टायपोडोन्ट दातांवर थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक उपचार पध्दती शिकविली जात आहे.

अशा आहेत सुविधा

नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये लॉमिनार ऐअर फ्लो सारखे जीवाणू आणि धुळ कमी ठेवणारी यंत्रणा असल्याने निर्जंतुकीकरण सोपे झाले आहे. यात गरजेप्रमाणे बदल केव्हाही करता येतात. सुरक्षिततेसाठी असलेली आंतरराष्ट्रीय मानके लक्षात घेऊन या नवीन ऑपरेशन थिएटरमध्ये सुविधा आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.