Champions League 2025 : पीएसजीची 'पंचतारांकित' विजेतेपदावर मोहर; इंटर मिलानचा ५-०ने धुव्वा; डेसिरे डुएचा दमदार खेळ
esakal June 02, 2025 03:45 PM

PSG Clinches Maiden Champions League Title with 5-0 Rout Over Inter Milan; 19-year-old Desiré Doué Stars in Final : लुईस एनरिक यांच्या मार्गदर्शनात पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबने शनिवारी मध्यरात्री फुटबॉलच्या रणांगणात ऐतिहासिक कामगिरी केली. फ्रान्सच्या पीएसजी क्लबने इटलीच्या इंटर मिलान क्लबचा ५०० असा धुव्वा उडवत पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीग या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहर उमटवली.

याआधी २०१९-२० मध्ये बायर्न म्युनिच संघाकडून पराभूत झाल्यामुळे पीएसजी क्लबला चॅम्पियन्स लीग स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र त्यांनी विजेतेपदाला गवसणी घालण्याचे स्वप्न पूर्ण केले. २०२३ नंतर इंटर मिलान क्लबला पुन्हा उपविजेतेपदच मिळाले.

१९ वर्षीय डेसिरे हुए याने पीएसजीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पीएसजीने केलेल्या पाचपैकी दोन गोल त्याने केले. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत गोल करणारा तो तिसरा युवा खेळाडू ठरला. डुएचे सध्याचे वय १९ वर्षे व ३६२ दिवस आहे. याआधी एजाक्स क्लबसाठी पॅट्रिक क्लूवर्ट याने व पोर्टी क्लबसाठी कार्लोस अॅल्बर्टो याने कमी वयामध्ये गोल करताना दमदार कामगिरी केली होती.

पीएसजी इंटर मिलान या दोन क्लबमध्ये अटीतटीची झुंज रंगेल, अशी अपेक्षा होती, मात्र लुईस एनरिक यांच्या योजना यशस्वी ठरल्या. त्यांच्या भेदक चालींसमोर इंटर मिलान क्लबचा निभाव लागला नाही. इंटर मिलान क्लब बचावात्मक खेळावर जोर देणार, हे एनरिक यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी पीएसजी क्लबमधील खेळाडूंना आक्रमक खेळाचा सल्ला दिला. १ख्या मिनिटाला अश्रफ हकिमीने, तर २०व्या मिनिटाला डेस्सिरे डुए याने गोल केला व २-० अशी आघाडी मिळवली.

उत्तरार्धात वेगवान खेळ

पीएसजी क्लबकडून उत्तरार्धात आणखी वेगवान खेळ करण्यात आला. ६३व्या मिनिटाला डेसिरे डुए याने, ७३व्या मिनिटाला खविचा क्वारतखेलिया याने आणि ८६व्या मिनिटाला सेनी मायुलू याने गोल करीत पीएसजीला इंटर मिलान क्लबवर 'पंचतारांकित' विजय मिळवून दिला.

२०१० नंतर विजेतेपदाची झोळी रिकामी

इंटर मिलान क्लबने तीन वेळा चॅम्पियन्स लीगच्या अजिंक्यपदाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. इंटर मिलानने १९६४, १९६५ व २०१० मध्ये या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे, पण गेल्या १५ वर्षांमध्ये त्यांना या स्पर्धेच्या जेतेपदापासून दूर राहावे लागत आहे. २०२३ व २०२५ या दोन वर्षांमध्ये त्यांचा संघ उपविजेता राहिला आहे. दोन क्लबला मार्गदर्शन करताना चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देणारे लुईस एनरिक हे सहावे प्रशिक्षक ठरले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.