
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हिंदुस्थानात होणाऱ्या “महिला क्रिकेट विश्वचषक 2025” च्या तारखांची आणि ठिकाणांची घोषणा केली आहे. विश्वचषकाचा 13 वा हंगाम 30 सप्टेंबर 2025 रोजी सुरू होणार असून 2 नोव्हेंबरपर्यंत खेळला जाणार आहे. एकून आठ संघ विजेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आहेत. हिंदुस्थान आणि श्रीलंका या दोन देशांमधील पाच स्टेडियमवर सामने पार पडणार आहेत.
विश्वचषकाची सुरुवात 30 सप्टेंबर पासून होईल. पहिला सामना टीम इंडियाचा होणार असून बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्याचबरोबर पहिली सेमी फायनल 29 ऑक्टोबर रोजी गुवाहटी किंवा कोलंबोमध्ये खेळली जाईल तर, दुसरी सेमी फायनल 30 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये खेळली जाणार आहे. त्याचबरोबर फायनलचा थरार 2 नोव्हेंबर रोजी बंगळुरूमध्ये किंवा कोलंबोमध्ये रंगणार आहे. विश्वचषकासाठी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम, गुवाहटीच्या एसीए स्टेडियम, इंदौरच्या होळकर स्टेडियम, विशाखापट्टनमच्या एसीए-वीडीसीए स्टेडियम आणि कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. महिला विश्वचषकामध्ये हिंदुस्थान व्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांचा समावेश असणार आहे.