अवघ्या काही तासांमध्ये एमपीएलचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटनाचा सामना खेळण्यासाठी ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) तयार असून, ते रत्नागिरी जेट्सविरूद्ध मैदानात उतरतील. नाशिकने दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी त्यांना या कामगिरीच्या एक पाऊल पुढे जाऊन, ट्रॉफी उचलण्याची इच्छा असेल. मात्र, संघाला हे ध्येय साध्य करायचे असल्यास पाच असे खेळाडू आहेत, ज्यांची कामगिरी संघाच्या प्रवासात निर्णायक ठरेल.
मुकेश चौधरी (Mukesh Chaudhary)- ईगल नाशिक टायटन्स संघाच्या गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी याच्या खांद्यावर असेल. मागील वर्षी मुकेश संघाचा भाग झाल्यानंतर संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. मुकेशने गोलंदाजी सोबतच फलंदाजीत देखील उपयुक्त योगदान दिले होते. हंगामात तो संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. आयपीएल व भारत अ संघात खेळण्याचा त्याला अनुभव आहे. या अनुभवाचा तो संघाला नक्की फायदा करून देऊ शकतो.
प्रशांत सोलंकी (Prashant Solanki)- मुंबई क्रिकेट असोसिएशनला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र संघात सामील झालेला लेगस्पिनर प्रशांत सोलंकी ईगल नाशिक टायटन्स संघाचे सलग दुसऱ्या वर्षी नेतृत्व करेल. गोलंदाजी आणि कर्णधारपद अशी दुहेरी भूमिका त्याने योग्यरीत्या सांभाळली होती. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी तीन हंगाम खेळलेल्या प्रशांत याच्या गोलंदाजीची मोठी भूमिका नाशिकच्या यशात राहणार आहे. याव्यतिरिक्त प्रशांत फलंदाजीत देखील योगदान देऊ शकतो.
अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni)- महाराष्ट्र क्रिकेटमधील सर्वात उदयोन्मुख खेळाडू असलेला अर्शिन कुलकर्णी सलग तिसऱ्या वर्षी ईगल नाशिक टायटन्स संघाचा भाग असेल. पहिल्या दोन्ही हंगामात त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने व मध्यमगती गोलंदाजीने नाशिकच्या यशात सर्वाधिक योगदान दिले होते. त्याच्या नावे एमपीएलमध्ये शतक देखील असून, एक 97 धावांची खेळी देखील आहे. या कामगिरीनंतर त्याला भारताच्या अंडर 19 विश्वचषक संघात खेळण्याची संधी मिळाली होती. तसेच, मागील दोन हंगामापासून तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाचा सदस्य देखील आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत खेळण्याचा त्याचा अनुभव नाशिकच्या कामी येऊ शकतो.
अथर्व काळे (Atharva Kale)- एमपीएल 2024 मध्ये प्रथमच खेळणाऱ्या अथर्व काळे याने आपल्या वादळी फलंदाजीने विशेष ओळख मिळवली. आधी अनसोल्ड राहिल्यानंतर नाशिक संघात सहभागी झालेल्या अथर्व याने संघासाठी सर्वाधिक धावा बनवलेल्या. त्याने हंगामात सर्वाधिक 32 षटकार मारण्याची विश्वसनीय कामगिरी केली. नाशिकचा फलंदाजीला स्थैर्य देणाऱ्या अथर्व त्याच्यावर पुन्हा एकदा संघाची भिस्त असेल. धनराज शिंदे याच्या अनुपस्थितीत फिनिशर म्हणून देखील त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.
मंदार भंडारी (Mandar Bhandari)- ईगल नाशिक टायटन्सचा सर्वाधिक विश्वासार्ह फलंदाज म्हणून मंदार भंडारी याने आपली ओळख बनवली. पहिल्या दोन्ही हंगामात संघाला गरज असताना तो मैदानावर टिच्चून फलंदाजी करताना दिसला. एमपीएल 2024 मधील पहिले शतक त्याच्याच बॅटमधून आले होते. नाशिकला 2025 मध्ये विजेतेपदापर्यंत मजल मारायची असल्यास, मंदार याला पुन्हा एकदा आपला जलवा दाखवावा लागेल.
एमपीएल 2025 सोबतच डब्ल्यूएमपीएल (WMPL) ही महिला क्रिकेटपटूंची लीग देखील होणार आहे. या दोन्ही स्पर्धा गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जातील. या दोन्ही स्पर्धांसाठी प्रेक्षकांना कोणत्याही तिकीटाविना प्रवेश दिला जाणार आहे. JioHotstar OTT आणि Star Sports 2 टीव्ही चॅनलवर या स्पर्धेचा आनंद घेता येईल, अशी माहिती एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)