Multibagger Stocks : फक्त ३ आठवड्यात दिला १०० टक्क्यापेक्षा जास्त नफा, स्मॉल कॅप शेअर्स तुफान तेजीत
ET Marathi June 03, 2025 10:45 AM
मुंबई : पॅकेजिंग उद्योगाशी संबंधित स्मॉल कॅप कंपनी कॉस्मो फर्स्टचे शेअर्स तेजीत आहेत. सोमवारी बीएसईवर हा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून १२४६.७० रुपयांवर पोहोचला. शेअर्सचा हा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. गेल्या ३ आठवड्यात कॉस्मो फर्स्टच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा (Cosmo First Share returns) दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये १०३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स १२ मे २०२५ रोजी ६१३.८० रुपयांवर होते. तर २ जून २०२५ रोजी कॉस्मो फर्स्टचे शेअर्स १२४६.७० रुपयांवर पोहोचले आहेत.



दोन आठवड्यात ८२% परतावा


कॉस्मो फर्स्टचे शेअर्स (Cosmo First Share price) मागील दोन आठवड्यात ८२ टक्क्यांनी वाढले आहेत. चौथ्या तिमाहीतील चांगल्या निकालांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. ११ एप्रिल २०२२ रोजी कॉस्मो फर्स्टच्या शेअर्सनी १४२६.६७ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.





नफ्यात मोठी वाढ

चौथ्या तिमाहीत कंपनीचा करपश्चात नफा वार्षिक आधारावर ८० टक्क्यांनी वाढून २७ कोटी रुपये झाला. जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत कंपनीचा EBITDA २६.९% वाढून ८५ कोटी रुपयांवर पोहोचला. कॉस्मो फर्स्टने सांगितले की, गेल्या तीन वर्षांत त्यांनी बीओपीपी, कास्ट पॉलीप्रोपायलीन लाईन्स, पॉलिस्टर लाईन्स, मेटालायझर्स, कोटिंग लाईन्स, विंडो/पीपीएफ फिल्म्स यासह विविध विकास प्रकल्पांमध्ये १,१८० कोटी रुपये गुंतवले आहेत.



नवीन BOPP पॅकेजिंग उत्पादन लाइन

कॉस्मो फर्स्टने सोमवारी त्यांच्या नवीन बीओपीपी (बायएक्सियली ओरिएंटेड पॉलीप्रॉपिलीन) फिल्म लाइनच्या यशस्वी लाँचची घोषणा केली. नवीन बीओपीपी फिल्म लाइन औरंगाबाद, महाराष्ट्र येथील विद्यमान उत्पादन प्रकल्पात ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली खर्चाने उभारण्यात आली आहे. या नवीन लाईनची वार्षिक क्षमता ८१,२०० मेट्रिक टन आहे आणि ती जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. नवीन लाईन सुरू झाल्यानंत कंपनीची वार्षिक बीओपीपी क्षमता ४० टक्क्यांनी वाढून २,७७,००० मेट्रिक टन होईल. कॉस्मो फर्स्टमधील विशेष विक्री गेल्या ६ वर्षांत १०% ने वाढत आहे.



© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.