स्टॅवँजर : भारताचा १९ वर्षीय विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेश याने ६४ घरांच्या पटावर ऐतिहासिक चाल करत जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याला आज पराभूत केले. गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील क्लासिकल प्रकारात कार्लसन याच्यावर मात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कार्लसन याने या स्पर्धेतील पहिल्या फेरीमध्ये डी. गुकेशवर विजय मिळविला होता. त्यानंतर गुकेश - कार्लसन यांच्यामध्ये सहाव्या फेरीतही लढत झाली. या फेरीआधी गुकेशवर दबाव होता त्याचे पटावरही परिणाम दिसू लागले होते. कार्लसनकडून सहाव्या फेरीत छान खेळ होत होता. मात्र त्याच्याकडून एक चूक घडली आणि पराभवाच्या छायेत असलेल्या गुकेशला यामुळे मोठी संजीवनी मिळाली.
गुकेशने विजय मिळवून तीन गुण वसूल केले. गुकेशसमोर आपली चाल चुकल्याचे कार्लसन यालाही समजले होते पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अखेर त्याने आपला राग टेबलावर व्यक्त केला. संतापत त्याने स्वतःचे हात टेबलावर आदळले. एरव्ही शांत चित्ताने चाली रचणारा कार्लसन पहिल्यांदाच भडकलेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे यानंतर त्याने माफीही मागितली. कार्लसन याच्या कृत्यामुळे समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला अनेकांनी त्याच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.