CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री ११ जूनला अकोल्यात; तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
esakal June 03, 2025 06:45 PM

अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात दि.११ जून रोजी विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ, मूर्तीजापूर तसेच अकोट विधानसभा मतदारसंघातील विविध कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा तसेच जनतेशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्ता संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी गुरुवारी (ता.११) क्रिकेट क्लब येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, तेजराव थोरात, किशोर पाटील, विजय अग्रवाल, जयंत मसने आदींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजनेअंतर्गत विविध कामांचा तसेच विकास कामाचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यानंतर जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी क्रिकेट क्लब येथे दुपारी एक वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमुळे दौऱ्याला महत्त्व

आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुका लक्षात घेता व महायुती सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडताना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोला दौरा महत्वाचा मानला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.