- तुषार जोशी, संस्थापक, हंड्रेड पर्सेन्ट पब्लिक रिलेशन्स
जनसंपर्क म्हणजेच ‘पब्लिक रिलेशन्स’ ही प्रत्येक क्षेत्राची गरज होत आहे. ज्याचा जनसंपर्क अधिक, ती व्यक्ती किंवा संस्था अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते आणि तिची वाटचाल अधिक सुकर होत जाते. त्यामुळे जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने माध्यमांसह विविध लोकांना जोडणारा दुवा म्हणून काम करणे अपेक्षित असते.
या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी?
- चालू घडामोडींविषयी जागरूक असावे. स्थानिक, राज्य व देशपातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती घेणे व ती अद्ययावत करणेही गरजेचे आहे. यासाठी दिवसात कमीत-कमी एकदा तरी वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहणे व वृत्तपत्राचे वाचन करण्याची सवय असावी. संवाद कौशल्य, वागण्या-बोलण्यातील औपचारिक शिष्टाचार, फोनवर संवाद साधण्याची कौशल्ये आणि समूहातील वावर या गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे आणि योग्य शिष्टाचार अंगवळणी पाडून घ्यावेत. मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा व्यवस्थित समजणे, लिहिता-बोलता येणे महत्त्वाचे आहे.
या क्षेत्रात प्रवेश कसा करावा? त्यासाठी कोणते अभ्यासक्रम असतात?
- भारतात ‘पीआर’चे क्षेत्र विस्तारत आहे. या क्षेत्रात २०२७ पर्यंत थेट काम करणाऱ्यांची संख्या ही तब्बल २४ हजार इतकी असेल असा अंदाज ‘पब्लिक रिलेशन्स कन्सल्टंट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने वर्तवला आहे. मास कम्युनिकेशन व मीडियासंबंधी अभ्यासक्रम राबविणाऱ्या भारतातील बऱ्याच विद्यापीठांमध्ये ‘पीआर’ विषयाचे स्पेशलायझेशन दिले जाते. डिग्रीइतकेच महत्त्व या क्षेत्रात ‘फिल्ड वर्क’ किंवा ‘इंटर्नशिप’ला आहे. त्यासाठी चांगल्या संस्थेत काम करण्याचा अनुभव घ्यावा.
जनसंपर्कासाठी कोणती कौशल्ये असावीत?
- संवाद कौशल्य महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तींच्या भावनांचा आणि विचारांचा आदर करण्याची सवय विकसित करणे, बऱ्याचदा स्वत:हून संवादाला सुरुवात करणे व तो कायम राखण्यासाठी सुयोग्य प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. याबरोबरच आपल्या वागण्या-बोलण्यातून आपली स्वत:ची प्रतिमा सकारात्मक असावी याकडेही विशेष लक्ष द्यायला हवे. या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी नवी माहिती मिळविण्यासाठी जागरूक व उत्सुक असणे महत्त्वाचे ठरते.
जनसंपर्कासाठी...
- नवे विषय निवडा व नवी आव्हाने पेलण्यास सदैव सज्ज राहा.
- राजकारण, मनोरंजन यांमध्ये पीआर क्षेत्राचा मोठा विस्तार होण्याची शक्यता असल्याने त्या क्षेत्राचा अभ्यास करा आणि स्वतःची ओळख निर्माण करा.
- आपले व्यक्तिमत्त्व सर्वांना प्रसन्न, सकारात्मक वाटेल अशा प्रकारे घडवण्याचा प्रयत्न करा.
(शब्दांकन : मयूर भावे)