महाराष्ट्रात अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता एमएचटी-सीईटी ही परीक्षा महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी या परीक्षेनंतर उमेदवारांना ‘CAP’ (सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस) राऊंड्सद्वारे कॉलेज व ब्रँच (शाखा) निवडण्याची संधी दिली जाते. ‘कॅप’ ही एक केंद्रीय समन्वयित प्रवेशप्रक्रिया असून, तिचा कालावधी सुमारे ६ ते ८ आठवड्यांचा असतो.
कॅप प्रक्रिया कशी असते?
कॅप प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने पार पडते. सर्वप्रथम सीईटी निकालानंतर उमेदवारांना ‘फॉर्म भरणे’ (रजिस्ट्रेशन) आणि ‘डॉक्युमेंट अपलोड’ करण्याचे काम करावे लागते. त्यानंतर ‘डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन’ जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये केले जाते आणि उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर होते.
मागील वर्षी कॅप राउंड १, २ व ३ अशा तीन फेऱ्या घेऊन कॉलेज व शाखा निवड प्रक्रिया पार पडली होती. उमेदवाराने एका फेरीत मिळालेल्या जागेचा स्वीकार केला (फ्रिज), तर पुढील फेरीत त्याचा सहभाग बंद होतो. जागा नाकारली (बेटरमेंट, नॉट फ्रिज), तर पुढील फेरीस तो पात्र होतो. तिसऱ्या राउंडनंतर रिक्त राहिलेल्या जागा ‘स्पॉट राउंड’द्वारे महाविद्यालय स्तरावर भरल्या जातात.
आवश्यक कागदपत्रे
सीईटी निकालपत्र, जेईई मेन निकाल (दिली असल्यास), दहावीचे गुणपत्रक व बोर्ड प्रमाणपत्र, बारावीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला (LC), मायग्रेशन प्रमाणपत्र (स्टेट बोर्ड वगळता सर्वांसाठी), डोमिसाईल प्रमाणपत्र (नसल्यास उमेदवाराला ‘इतर राज्यातील-OMS’ समजले जाईल), जन्मदाखला (जन्म महाराष्ट्रातील असावा), अपडेटेड आधार कार्ड (मोबाइल क्रमांक लिंक असावा), ड्रॉपर विद्यार्थ्यांसाठी - गॅप सर्टिफिकेट १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर असावे.
ओबीसी/एसबीसी/एसईबीसी/व्हिजे प्रवर्गासाठी
तहसीलदाराकडील जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (फक्त वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी), उत्पन्नाचा दाखला (२०२४-२५)
एससी/एसटी प्रवर्गासाठी
जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र
ईबीसी/ईडब्ल्यूएस/टिएफडब्ल्यूएस (खुला प्रवर्ग)
उत्पन्न प्रमाणपत्र (२०२४-२५) (८ लाखापेक्षा कमी), राष्ट्रीय बँकेत खाते असलेले पासबुक, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र
विशेष राखीव प्रवर्गासाठी
संरक्षण प्रवर्ग - पालकांचे सेवा प्रमाणपत्र, अपंग (PwD)- वैद्यकीय प्रमाणपत्र
लक्षात ठेवा
‘कॅप’प्रक्रियेसाठी तुमचा चालू ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण सर्व सूचना त्यावर पाठवल्या जातात. सीईटी सेलची कॅप प्रक्रिया ही अत्यंत नियोजनपूर्वक पार पाडण्यासाठी वेळेत सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवून, इच्छित कॉलेज व तेथील शाखांची अचूक माहिती भरल्यास मेरिटप्रमाणे प्रवेश मिळवणे शक्य होते.
मागील वर्षीच्या ‘कट ऑफ’चा अभ्यास, उपलब्ध जागा (सीट मॅट्रिक्स), आरक्षण, महाविद्यालयांचे प्रकार (ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस इ), फी स्ट्रक्चर, पर्यायी शाखा, प्लेसमेंट रेकॉर्ड, आवश्यक कागदपत्रे इत्यादींची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून घ्या.