इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेला ७४ सामन्यांनंतर अखेर विजेता मिळाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून आयपीएल सुरू असलेला थरार अखेर ३ जून रोजी संपला. १८ वर्षांपासून प्रतिक्षा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजेतेपदाला गवसणी घातली.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मंगळवारी (३ जून) बंगळुरूने पंजाब किंग्सला अवघ्या ६ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलचे आठवे आणि नवे विजेते ठरले.
या अंतिम सामन्यानंतर विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि उपविजेत्या पंजाब किंग्स संघाचा गौरव करण्यात आला. तसेच संपूर्ण पर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
यादरम्यान मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू म्हणजेच मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला. हा मान मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज पटकावला. सूर्यकुमार आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावाजला गेला.
सूर्यकुमार यादवने यंदा सुरुवातीपासून शानदार कामगिरी बजावली. त्याने जवळपास प्रत्येक सामन्यात त्याचे योगदान दिले. दरम्यान, मुंबईला क्वालिफायर २ सामन्यात पंजाब किंग्सकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे आव्हान संपले. पण सूर्यकुमारने त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२५ मध्ये १६ सामने खेळताना ६५.१८ च्या सरासरीने ७१७ धावा चोपल्या. त्याची यादरम्यान सरासरी स्ट्राईक रेट १६७.९१ चा होता. त्याने ५ अर्धशतकेही झळकावली. या १६ सामन्यांमध्ये सूर्यकुमारने ६९ चौकार आणि ३८ षटकार मारले.
सूर्यकुमार यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये साई सुदर्शनच्या (७५९ धावा) पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
सूर्यकुमारचा विक्रमसूर्यकुमार याने या हंगामात ७१७ धावा केल्याने तो मुंबई इंडियन्सचा एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तसेच ७०० धावा एका आयपीएल हंगामात पार करणाही मुंबई इंडियन्सचा पहिलाच खेळाडू ठरला.
याशिवाय दोन वेळा आयपीएल हंगामात ६०० हून अधिक धावा करणाराही तो मुंबई इंडियन्सचा पहिलाच खेळाडू आहे. त्याने याआधी २०२३ आयपीएलमध्ये १६ सामन्यांत ६०५ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्सकडून त्याच्याशिवाय केवळ सचिन तेंडुलकरने एकदाच ६०० धावांचा टप्पा पार केला आहे. सचिनने २०१० आयपीएलमध्ये ६१८ धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्ससाठी एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज७१७ धावा - सूर्यकुमार यादव (२०२५)
६१८ धावा - सचिन तेंडुलकर (२०१०)
६०५ धावा - सूर्यकुमार यादव (२०२३)
५५३ धावा - सचिन तेंडुलकर (२०११)
५४० धावा - लिंडल सिमन्स (२०१५)
५३८ धावा - रोहित शर्मा (२०१३)