जीव द्यायची धमकी, गाडीत बसवून लॉजवर नेलं, नराधमाने 37 वर्षीय महिलेशी ठेवले जबरदस्ती संबंध, फोट
Marathi June 04, 2025 07:26 PM

पुणे : सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका 40 वर्षीय नराधमानं एका 37 वर्षीय विवाहित महिलेला धमकावत लग्नाची मागणी घालत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीने विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. त्यानंतर काढलेले फोटो, व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.

ही संतापजनक घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली असून, पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नानासाहेब (पूर्ण नाव पोलीस तपासात) गेल्या दोन महिन्यांपासून पीडित विवाहितेला वारंवार त्रास देत होता. नराधम आरोपीने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली, त्याचबरोबर तिच्यावर मानसिक दबाव टाकत राहिला, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला धमकी दिली की, जर तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर मी तुझ्या कामाच्या ठिकाणी येऊन फिनाइल पिऊन आत्महत्या करेन. या धमकीने घाबरलेली पीडित महिला आरोपीच्या गाडीत बसून त्याच्यासोबत लॉजवर गेली, तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले आणि पुढे याच गोष्टीमुळे तिच्यावर आणखी दबाव टाकू लागला. माझ्याशी लग्न कर नाहीतर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवीन, असं म्हणत लग्नासाठी तगादा लावला.

या संपूर्ण त्रासाला कंटाळून पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी नानासाहेब याच्या विरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.