ढिंग टांग : नवशिव आघाडीचा विजय असो..!
esakal June 06, 2025 11:45 AM

ढिंग टांग

सदू : (सावधगिरीने फोन फिरवत) म्यांव म्यांव…म्यांव म्यांव..!

दादू : (तितक्याच सावधगिरीने फोन उचलत) हा माझाच रिंगटोन आहे की कुणी माझी चेष्टा करतंय?

सदू : (झटकन आवाज ओळखत) दादूराया, अरे…मीच बोलतोय! तुझा शिवाजी पार्कचा बिछडलेला भाऊ!!

दादू : (चेष्टेने) हां हां! तो लहानपणी जत्रेत हरवलेला?

सदू : (मूळ मुद्द्यावर येत) फोन कधी करणार आहेस?

दादू : (गोंधळून) कोणाला?

सदू : (किंचित वैतागून) कोणाला काय विचारतोस? मलाच!!

दादू : (आणखी गोंधळून) आत्ता तूच केलायस ना फोन?

सदू : (खुलासा करत) तसा नव्हे रे! शिळोप्याच्या गप्पा मारायला आपण नेहमीच फोनवर बोलतो! राजकीय फोन कधी करणार आहेस?

दादू : (च्याटंच्याट पडत) हा काय नवा प्रकार आहे फोनचा? राजकीय फोन म्हंजे रे काय?

सदू : (उलगडून सांगत) आपलं एकमेकांना टाळी देण्याचं चाललंय ना? त्या संदर्भात कधी फोन करणार आहेस?

दादू : (उजेड पडत) हां हां! ते होय…मी तुझ्याच फोनची वाट बघत बसलोय!

सदू : (कटकटलेल्या सुरात) वाट कशाला बघायची, स्वत: का नाही केलास?

दादू : (सावध होत) अडलंय माझं खेटर! मी कशाला करु फोन? ज्याला टाळी हवी, त्यानं फोन करावा!!

सदू : (निर्विकारपणाने) मग तुला नकोय का टाळी? मग ऱ्हायलं! सोड तो विषय!!

दादू : (घाईघाईने) तसं नव्हे रे! टाळीसाठी मी किती सकारात्मक आहे, हे तुला माहीत आहे ना? तू टाळीच काय, काहीही माग!!

सदू : (हातावर फुंकर मारत) दोनदा केला होता, पोळून घेतलाय हात!!

दादू : (चतुराईनं) जुन्या गोष्टी कशाला उकरुन काढायच्या सदूराया! आज अवघा महाराष्ट्र आपल्या बंधूयुतीची आतुरतेनं वाट बघतोय! कधी एकदा आपली दिलजमाई होते, याची घाई सुटली आहे सर्वांना! अशावेळी आपण महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला हवं, हे मला पटलंय!!

सदू : (सद्गगदित होत्साते) अब रुलायेगा क्या?

दादू : (कर्तव्यबुद्धीनं) किंबहुना मी आजवर ज्या काही युत्या, आघाड्या केल्या, त्या महाराष्ट्राच्या हितासाठीच होत्या!! माझं काय, मी निरिच्छ आहे…

सदू : (उतावळेपणानं) मग ठरलं तर..! आपलं हे नक्की ना?

दादू : (शब्द देत) ठरलं म्हणजे ठरलं! आमचं ठरलंय, असंच आपण सांगायचं!!

सदू : (खुशीत येत) आपली युती ही साधीसुधी युती नाही! महाराष्ट्राच्या हितासाठी पडलेली ही नवाशिवाची गाठ आहे! आपली नवशिव आघाडी!! कसं वाटलं नाव?

दादू : (कौतुकानं) तुला भारी सुचतं हं कधी कधी! उगीच नाही, चांगला व्यंगचित्रकार झालास! अभिमान वाटतो मला तुझा!!

सदू : (व्याजासकट परत करत) तूसुद्धा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा फोटोग्राफर आहेस! तुझी लेन्सच नाही तर मेमरीही फोटोग्राफिक आहे…

दादू : (खोट्या रागानं) हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस! मी तुला लहानपणापास्नं ओळखतो!

सदू : (खुशीत येत) माझा नंबर आहे ना सेव्ह केलेला?

दादू : (चक्रावून) कसला नंबर?

सदू : (कपाळाला हात लावत) तू फोन करशील ना मला?

दादू : (आणखी चक्रावून) मी आता कशाला फोन करु? तू केलास ना? उगीच बिल जास्ती येतं…

सदू : (संयम राखून) मग आपली नवशिव आघाडी कशी होणार? फोन करावाच लागेल!!

दादू : (धूर्तपणाने) आधी तू एक मिस्ड कॉल दे, मग मी एक देतो! चालेल?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.