Pune Accident : भरधाव वेगात दुचाकी घसरल्याने तरुणाचा मृत्यू
esakal June 05, 2025 03:45 AM

पुणे - भरधाव वेगात जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा सहप्रवासी मित्र जखमी झाला. ही दुर्घटना एरंडवणे येथील आठवले चौकाजवळ घडली.

या अपघातात तन्मय सचिन कळंत्रे (वय २१, रा. नंदनवन सोसायटी, कोथरूड) या तरुणाचा मृत्यू झाला. त्याचा मित्र सेतू सुरेंद्र सरकार हा अपघातात जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डेक्कन पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय डेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय आणि सेतू हे दुचाकीवरून शनिवारी (ता. ३१) दुपारी दुपारी चारच्या सुमारास भरधाव वेगाने जात होते. एसएनडीटी महाविद्यालयासमोरील कॅनॉल रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरून दोघे रस्त्यावर पडले.

या अपघातात तन्मयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद मंगळवारी (ता. ३) डेक्कन पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.