Khamgaon News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा काँग्रेसला रामराम
esakal June 05, 2025 03:45 AM

खामगाव - खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी ३१ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या सदस्य व पक्ष संघटनेतील सर्व पदाचा राजीनामा दिला असून आज त्यांनी तशी अधिकृत माहिती दिली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेसकडून सलग ३ टर्म आमदार राहले आहेत. दरम्यान मागील काही महिन्यांपासून ते नाराज असून काँग्रेसला सोडचीठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. तर ३१ मे रोजी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आपल्या सदस्य पदाचा राजीनामा पाठवला आहे.

राजीनाम्या मद्ये त्यांनी मी मागील ४० वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेस पक्षाच्या तत्वाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटन वाढविण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केलेले आहे. पक्षाने सुधा मला खूप काही दिले त्याचा मी ऋणी राहील.

मी खामगाव विधानसभा मतदार संघाचा काँग्रेस पक्षाचा पक्षनेता असतांना मला विश्वासात न घेता २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या व भाजपाच्या उमेदवारास निवडूण आणण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मदत केली.

त्यांच्यावरच २६ एप्रिल २०२५ रोजी खामगाव येथील सद्भावना संकल्प सभेची जबाबदारी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या कंपुंना देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांनी २४ एप्रिल २०२५ रोजी नावानिशी सर्व वरीष्ठांना तक्रार केल्यानंतर देखील अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे.

म्हणून मी माझ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या क्रियाशील सदस्य पदाचा व माझ्याकडे जी काही काँग्रेस पक्षाच्या संघटनेची पदे असतील त्यांचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा त्वरित स्वीकारावा असेही सानंदा यांनी म्हंटले आहे.

सकाळच्या बातमीवर शिक्कामोर्तब, राष्ट्रवादीत करणार प्रवेश

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधणार असल्याबाबत दैनिक सकाळने १ जून रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर आज सानंदा यांनी काँग्रेसचा राजीनामा देवून सोडचिठ्ठी दिल्याची माहिती दिली आहे.

यामुळे सकाळच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले असून येत्या १२ जून रोजी दिलीपकुमार सानंदा हे खामगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुरूवार ता. ५ जून रोजी खामगाव येथे राष्ट्रवादीचे अमरावती विभागाचे समन्वयक आमदार संजय खोडके, दिलीपकुमार सानंदा यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १२ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात स्थानिक विश्राम भवन येथे राष्ट्रवादीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.