Ahilyanagar News: माेठी बातमी! 'राज्यात दररोज तीन महिलांना स्तनाचा कर्करोग'; ३६ लाख महिलांची चाचणी, विळखा वाढला
esakal June 06, 2025 05:45 PM

अहिल्यानगर : राज्यात स्तन कर्करोगाचा वाढता विळखा असून, राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या चाचण्यांमधून रुग्णांची ओळख पटवण्यात मदत होत आहे. २०२४-२५ या वर्षात राज्यात दररोज तीन महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

आरोग्य विभागाने चालवलेल्या स्तनाच्या कर्करोग तपासणी कार्यक्रमामुळे या आजाराची माहिती नसलेल्या महिलांमध्ये हा आजार आढळून आला. आरोग्य विभाग या सर्व रुग्णांना उपचारांसाठी मार्गदर्शन आणि मदत करत आहे.स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. तो स्तनांमधील पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो. वेळेत ओळख पटली नाही, तर शरीराच्या इतर भागात पसरू शकतो.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने चालवलेल्या राष्ट्रीय संसर्गजन्य रोग प्रतिबंधक आणि नियंत्रण कार्यक्रम (एनपी-एनसीडी) अंतर्गत २०२४-२५ या वर्षात महिलांच्या आरोग्य तपासणीदरम्यान राज्यभरात ३६,५२,३७६ महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,२७२ महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची पुष्टी झाली आहे. यापैकी १,०७५ महिला सध्या उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या मते, हा कार्यक्रम विशेषतः असंसर्गजन्य आजारांची ओळख पटवणे, वेळेवर उपचार करणे आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी चालवला जात आहे. स्तनाच्या कर्करोगासारख्या प्राणघातक आजाराची लवकर ओळख आणि त्वरित उपचार केल्याने चांगले परिणाम मिळतात.

राज्याचे असंसर्गजन्य आजार या विभागाचे सहसंचालक डॉ. उमेश  शिरोडकर यांनी सांगितले की, आम्ही फक्त तपासणीपुरते मर्यादित राहू इच्छित नाही, तर आमचे उद्दिष्ट गाव ते जिल्ह्यापर्यंत स्तनाच्या कर्करोगाचे उपचार उपलब्ध करून देणे आहे. यामध्ये डे केअर सेंटर हा एक मोठा दुवा असेल. आरोग्य विभाग सर्व महिलांना दर महिन्याला, विशेषतः वयाच्या ३० नंतर स्वतः स्तन तपासणी करण्याचा सल्ला देतो. मासिक पाळी संपल्यानंतर सात दिवसांनी ही तपासणी करणे सर्वात योग्य मानले जाते.

केंद्रांवर प्राथमिक तपासणी

केंद्रांवर स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक तपासणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे अधिकारी ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये गाठी किंवा कोणत्याही संशयास्पद बदलांची तपासणी करतात. गरज पडल्यास, रुग्णाला उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. जिथे मॅमोग्राफी, बायोप्सी आणि पुढील तपासणी केली जाते. त्यामुळे जवळच उपचार मिळणे शक्य होणार आहे.

मुख्य उपचार केंद्रे

रुग्णाला शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा प्रगत उपचारांची आवश्यकता असल्यास त्यांना वैद्यकीय महाविद्यालये, प्रादेशिक कर्करोग केंद्रे (जसे की टाटा हॉस्पिटल, विवेकानंद लातूर, संत तुकडोजी महाराज रुग्णालय) येथे पाठवले जाते.

सामान्य लक्षणे स्तन किंवा काखेत गाठ किंवा सूज स्तनाग्रातून असामान्य स्राव व (रक्त किंवा पिवळसर द्रव) स्तनाच्या त्वचेत बदल (खड्डे येणे किंवा आकुंचन पावणे) स्तनाग्र आतल्या बाजूला वळणे स्तनाच्या आकारात किंवा रंगात बदल.

मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी

राज्यभरात आठ आरोग्य क्षेत्रे आहेत. प्रत्येक प्रदेशात एक कर्करोग व्हॅन तैनात करण्यात आली आहे, जी जिल्हा स्तरावर निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार गावांना भेट देते. या व्हॅनद्वारे स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.