नांदेड : शहरामध्ये मनपा हद्दीत यावर्षी वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार केवळ तीन लाख दहा हजार झाडे अस्तित्वात आहेत, तर दुसरीकडे शहरातील आठ लाख लोकसंख्या विचारात घेता ‘एक व्यक्ती एक झाड’ याप्रमाणेसुद्धा पूर्तता करण्यात नांदेडकर कमी पडलेले आहेत. त्यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी व सुजाण नागरिकांनी हरित नांदेड अभियानात जास्तीत-जास्त संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या विसावा उद्यानातील आयोजित कार्यक्रमात ‘हरित नांदेड’ अभियानास सुरवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी गुरुद्वारा लंगर साहिबचे बाबा हरिसिंघजी, तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे, उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या उपस्थितीसह विविध सामाजिक संस्था व वृक्षमित्र फाउंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सव्वीस हजार वृक्षलागवड अभियानाला प्रारंभसात वर्षांपासून लोकसहभागातून वृक्षलागवड संगोपनाचे कार्य सुरू आहे. मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे यांच्या संकल्पनेतून ‘हरित नांदेड’ उपक्रमांतर्गत २०२५ च्या मॉन्सूनमध्ये महापालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या विद्यमाने मनपा हद्दीत एकूण २६ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे. या अभियानाची सुरवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. पाच) विसावा उद्यानात वृक्षारोपण करून करण्यात आली.
नांदेड शहराचे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी सर्व सामाजिक संस्था एकवटल्या असून, नियोजनबद्ध कार्यक्रमातून वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी महापालिका प्रशासन, वृक्षमित्र फाउंडेशन, गुरुद्वारा लंगर साहेब व शहरातील विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध भागांत वृक्षारोपण करून लागवड केलेले वृक्ष जोपासण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक संघटनेमार्फत ट्री-गार्ड, ठिबक सिंचन, तार फेन्सिंग इत्यादी आवश्यक बाबींची पूर्तता केली जाणार आहे. या कार्यक्रमास प्र. अतिरिक्त आयुक्त सुप्रिया टवलारे, उपआयुक्त नितीन गाढवे, वनपरिक्षेत्रीय अधिकारी चव्हाण, मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, सहायक आयुक्त मो. गुलाम सादिक, क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, रमेश चवरे, राजेश जाधव यांची उपस्थिती होती.
या संस्था झाल्या सहभागीया अभियानामध्ये सामाजिक संस्था वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, रोटरी क्लबचे, वासवी क्लब, गोदावरी नदी संसद, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असो., नांदेड जनरल ट्रेडर्स असोसिएशन, लायन्स प्राइड नांदेड, मेथेडिस्ट मेन्स-मेथेडिस्ट चर्च, श्री दत्तकृपा सेवाभावी संस्था वाघाळा, महाराष्ट्र आर्यवैश्य महिला महासभा, राऊ प्रतिष्ठान हडको, ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ धुप्पा, नायगाव, अग्रवाल महिला मंडळ, श्रीसंत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्था, ब्रह्मकुमारीज वसंतनगर, गार्गी संस्कार केंद्र, नांदेड ब्लॉगर्स ग्रुप, मातृसेवा संघ, नांदेड, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, आर्यवैश्य शिक्षक संघ, अग्रसेन समिती, नांदेड, फिंगर प्रिंट प्री-स्कूल, लायन्स क्लब एंजल्स, नांदेड आदी संस्था सक्रिय सहभागी असणार आहेत.