- महेंद्र गोखले, फिटनेसविषयक प्रशिक्षक
आपले शरीर हे एक मशीन आहे असे मानले, तर शरीराची देखभाल करणे, आवश्यक तेव्हा दुरुस्ती करणे, स्नायूंची योग्य वाढ होणे आणि एन्झ़ाइम्स आणि हार्मोन्स तयार करणे अशा अनेक कार्यांसाठी आपल्याला प्रथिने म्हणजे प्रोटिन्स आवश्यक असतात. त्यांना अनेकदा जीवनाचा ‘बिल्डिंग ब्लॉक’ म्हटले जाते.
असे असूनसुद्धा बरेच लोक आपल्या दैनंदिन आहारात प्रोटिन्सच्या प्रमाणाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. या लेखात, आपण प्रोटिन्सचे आपल्या आहारातले प्रमाण कमी झाले तर काय परिणाम होतात याबाबत चर्चा करू; तसेच आपल्या रोजच्या आहारात प्रोटिन्सचे प्रमाण योग्य आहे की नाही, याची खात्री कशी करता येईल याची माहिती घेऊ. भारतीय आहाराच्या आणि विशेषत: शाकाहारी पद्धतीच्या आहारात कदाचित प्रोटिन्सचे प्रमाण कमी असते.
आपल्या शरीरातील बहुतेक सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रोटिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या शरीरातील ‘मसल मास’ नियंत्रित ठेवणे, प्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे, पेशींचे कार्य नियमन आणि दुरुस्ती करणे आणि त्वचा, केस आणि नखे निरोगी ठेवणे अशी महत्त्वाची कार्ये प्रोटिन्समुळे होतात. प्रोटीन्सचा पुरेसा साठा नसेल, तर शरीर चांगल्या प्रकारे कार्य करू शकत नाही, कारण ते स्वत:हून काहीही दुरुस्त करू शकत नाही किंवा आवश्यकतेनुसार नवीन पेशी तयार करू शकत नाही.
प्रोटिन्स शरीरासाठी नेमके काय करतात?
प्रोटिन्सचे अमिनो ॲसिड्समध्ये रूपांतर होते आणि शरीरातील नवीन पेशी, एन्झ़ाइम्, हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटर तयार होतात. या कार्यांमुळे आहारातील प्रोटिन्सचे महत्त्व आपल्याला कळते आणि त्यांचे आहारातील प्रमाण कमी झाले, तर काय परिणाम होऊ शकतात तेही समजते. अनेक अन्नपदार्थांतून आपल्याला प्रोटिन्स मिळू शकतात. परंतु आपल्या शरीरीला त्यांची गरज आणि त्याचा पुरवठा याची माहिती असणे आवश्यक आहे.
प्रोटिन्सचे दैनंदिन आहारातील प्रमाण
‘मला किती प्रोटिन्स आवश्यक आहेत?’ ज्यांना निरोगी आयुष्य हवे आहे आणि मसल्स कमवायचे आहेत त्यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. रोजची प्रोटिन्सची गरज ही व्यक्तीचे वय, ती स्त्री आहे की पुरुष आणि दिवसभरात होणाऱ्या हालचाली यांनुसार बदलते.
सरासरी एका प्रौढ व्यक्तीला रोजची प्रोटिन्सची गरज ही त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्रॅम मागे ०.८ ग्रॅम इतकी असते. आपल्या शारीरिक हालचाली सर्वसाधारण व्यक्तीपेक्षा जास्त असतील, तर हे प्रमाण वाढू शकते.
या प्रमाणानुसार सर्वसाधारणपणे एका प्रौढ महिलेसाठी दररोज सुमारे ४६ ग्रॅम प्रोटिन्सची आणि एका प्रौढ पुरुषासाठी दररोज सुमारे ५६ ग्रॅम प्रोटिन्सची गरज असते. परंतु खेळाडू किंवा जास्त शारीरिक हालचाली करणाऱ्या व्यक्तींना एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आणि मसल्सच्या रिकव्हरीसाठी जास्त प्रमाणात प्रोटिन्सची गरज असते.
दररोज किती प्रमाणात प्रोटिन्सची आवश्यकता आहे किंवा किती प्रोटिन्स आवश्यकतेपेक्षा जास्त असतील असा विचार तुम्ही करत असाल, तर बहुतेक प्रौढांनी आपल्या आवश्यकतेपेक्षा दुप्पट प्रोटिन्स घेतले तरी ते आरोग्याला अपायकारक नसतात. तरीही आवश्यकतेपेक्षा जास्त प्रोटिन्स घेतल्यास किडनीवर परिणाम होतो.
त्यामुळे आपल्या शरीराची प्रोटिन्सची गरज तज्ज्ञांकडून समजून घ्यावी आणि त्यानुसार प्रमाण ठरवावे. प्रोटिन्सच्या कमतरतेमुळे काय होते आणि प्रोटिन्स अपुऱ्या प्रमाणात मिळाली तर काय होते याबाबत पुढील लेखात जाणून घेऊ.
(क्रमशः)