Ratnagiri Jets vs Eagle Nashik Titans : क्रिकेट शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता असलेल्या अदाणी (MPL 2025) २०२५ स्पर्धेचा थरार आजपासून महाराष्ट्र क्रिकेट संघटना, गहुंजे येथे सुरू झाला. गतविजेता रत्नागिरी जेट्स विरुद्ध गत उपविजेता इगल नाशिक टायटन्स यांच्यात सलामीचा सामना सुरू आहे. पण, त्याआधी एक शानदार उद्घाटन सोहळा पार पडला गेला.
अदाणी समूहाचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत क्रिकेट शौकिनांना ट्वेंटी-२० क्रिकेटचा आनंद घेता येणार आहे. गतविजेता रत्नागिरी जेट्स आणि गत उपविजेता इगल नाशिक टायटन्स यांच्या लढतीने महाराष्ट्र प्रीमिअर लीग ( MPL 2025) च्या तिसऱ्या पर्वाची आज सुरुवात झाली. पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर ही लीग खेळवली जाणार आहे. नाशिकचा कर्णधार प्रशांत सोळंकीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
मुकेश चौधरीच्या पहिल्याच षटकात प्रीतम पाटीलने दोन खणखणीत षटकार खेचून रत्नागिरीला चांगली सुरुवात करून दिली. पण, पाचव्या चेंडूवर पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात प्रीतम ( १२) झेलबाद झाला. कर्णधार काझीने मोर्चा सांभाळताना रत्नागिरीच्या धावांचा वेग १०च्या सरासरीने सुरू ठेवला. चौथ्या षटकात धीरजला रन आऊट करण्याची संधी नाशिकच्या क्षेत्ररक्षकाने गमावली. पाचव्या षटकात अर्शिन कुलकर्णाला गोलंदाजीला आणले आणि त्याने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला आणि काझीने षटकाराने स्वागत केले.
पुढच्या चेंडूवर चौकार मिळाल्याने, अर्शिनच्या एका चेंडूंत ११ धावा रत्नागिरीला मिळाल्या. काझी आणि धीरज फटांगरे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण करताना संघाला सहा षटकांत १ बाद ६४ धावांपर्यंत पोहोचवले होते.
महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) स्पर्धेला ५ जूनपासून प्रारंभ होणार आहे आणि शानदार उद्घाटन समारंभाने प्रेक्षकांची मनं जिंकली. लोकप्रिय अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिने आपल्या दमदार नृत्य सादरीकरणाने चाहत्यांची मने जिंकली. कार्यक्रमात ड्रोन्सच्या साहाय्याने भव्य लाईट शो सादर करण्यात आला ज्याने उपस्थित प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चकित करणारा अनुभव दिला.