पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने पुणेकर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुणे आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यामुळे उकाड्यात वाढ झाली. शनिवारी (ता. २१) सकाळी ढगाळ वातावरण, तर दुपारी कडक ऊन पडले होते. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आणि मंदिरांमध्ये दर्शनासाठी वारकऱ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सायंकाळी सहाच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत हलक्या पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून वाचण्यासाठी त्यांना बसथांब्यांचा, दुकानांचा तसेच झाडांचा आसरा घ्यावा लागला.
पुढील दोन दिवसांत नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, राजस्थानच्या काही अधिक भागांमध्ये, पश्चिम उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबादच्या काही भागांमध्ये तसेच लडाखच्या काही अधिक भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. तसेच दक्षिण-पश्चिम बिहार आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. राजस्थान आणि लगतच्या परिसरात सरासरी समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवरील वरच्या हवेतील चक्रिय प्रणाली कायम आहे.
असा आहे पावसाचा अंदाजपुणे आणि परिसरात रविवारी (ता. २२) कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होणार असून, ते २७ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. २२) कमाल तापमान स्थिर राहणार असून ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले जाईल. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.