- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक, पण अनेक वेळा त्रासदायक ठरणारा काळ असतो. यामध्ये पोटदुखी, पाठदुखी, मुरकुंडी, मळमळ, थकवा, चिडचिड, झोप न लागणे, डोकेदुखी, वायुविकार, अपचन, कमकुवतपणा अशी लक्षणे दिसतात. पण योग्य योगाभ्यास, आहार, आणि दिनचर्या अंगीकारली तर हे त्रास खूपच कमी करता येतात.
मासिक पाळीमध्ये करायची योगासने
पाळी दरम्यान काही विशिष्ट आसने नकोत; परंतु सौम्य आणि सैलावणारी आसने उपयोगी ठरतात. पाळी नियमित ठेवण्यासाठी दररोज काही विशिष्ट योगासने जरूर करावीत.)
बद्धकोनासन : जमिनीवर मांडी घालून बसा. दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना लावून दोन्ही गुडघे शक्य तितके जमिनीच्या जवळ आणा. पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे सैल. हळूहळू गुडघे वरखाली हलवायला सुरुवात करा. दोन-पाच मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करत राहा. फायदे : पोटाखालचा भाग सैलावतो. गर्भाशय आणि अंडाशयाच्या भागातील रक्ताभिसरण सुधारतो. पाळी नियमित होण्यास मदत होते.
सेतूबंधासन : पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पाय जमिनीवर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. आता श्वास घेत घेत कंबर हळूहळू वर उचला. हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करा. काही क्षण थांबा, नंतर श्वास सोडत हळूच परत जमिनीवर या. फायदे : पाठदुखी कमी होते. हार्मोनल बॅलन्स राखण्यास मदत होते. पोटातील मांसपेशींना मजबुती मिळते.
मार्जारासन : हात आणि गुडघे जमिनीवर. श्वास घेत पाठ खाली वाकवा. श्वास सोडत पाठ वर उचला आणि मान खाली घ्या. हे दहा-पंधरा वेळा हळूहळू करा. फायदे : पाठदुखी व मुरकुंडी कमी होते. पोट आणि गर्भाशयाच्या भागात चांगला रक्तप्रवाह होतो.
शवासन : पाठीवर सरळ झोपा. दोन्ही पाय थोडे अंतर ठेवून पसरवा. हात बाजूला, तळवे वर. डोळे बंद करा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. पाच-दहा मिनिटे राहा. फायदे : तणाव व थकवा कमी होतो. झोपेच्या समस्या सुटतात. मानसिक शांती मिळते.
पाळीदरम्यान व दररोजचा आहार
हे टाळा : थंड पेये, सोडा, पिझ्झा, बर्गर, मैद्याचे पदार्थ. फास्ट फूड व तळलेले पदार्थ. अति कॅफीन आणि चहा/कॉफी
यांचे सेवन करा : उकडलेली हरभरा, मूग, डाळी (प्रथिनांसाठी). खजूर, बेदाणे, अंजीर (रक्तवाढीसाठी). हळदीचे दूध, मेथीच्या लाडू (वेदना कमी करतात). टोमॅटो, बीट, गाजर, पालक (आयर्नसाठी). भरपूर कोमट पाणी, ग्रीन टी.
दिनचर्या कशी असावी?
सकाळी लवकर उठून हलकासा योगाभ्यास किंवा प्राणायाम करा. उन्हात थोडा वेळ नक्की घालवा – व्हिटॅमिन डीसाठी. झोप नियमित आणि पुरेशी असावी (सात-आठ तास). मासिक पाळीदरम्यान शक्य तितकी विश्रांती घ्या. गरम पाण्याने स्नान करा, विशेषतः कंबरेवर पाणी ओतल्याने वेदना कमी होतात.
स्वतःची काळजी कशी घ्यावी?
पाळीच्या दिवसांत स्वतःला दोष देऊ नका; हा एक नैसर्गिक, शक्तीपूर्ण चक्राचा भाग आहे.
विश्रांती घ्या.
भावनिक अस्थैर्य असले तरी तणाव नको. संगीत, ध्यान, वाचन याचा उपयोग करा.
मासिक पाळी ही शरीराच्या शुद्धीकरणाची एक प्रक्रिया आहे. ती त्रासदायक वाटू नये यासाठी योगासने, योग्य आहार आणि दिनचर्येने शरीर आणि मन दोन्हीही संतुलित ठेवता येते. आजच्या धावपळीच्या काळात महिलांनी स्वतःकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. चला, आजपासूनच आपल्या शरीराची खरी काळजी घेऊया.